गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते व जेष्ठ मंत्र्याच्या घरात फूट पडली असून लवकरच त्यांची मोठी मुलगी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. आज जिल्ह्यातील आलापल्ली येथे झालेल्या जनसन्मान यात्रेत मंत्री यांनी स्वतः यासंदर्भात भाष्य केले असून विरोधात गेलेल्या जावई आणि मुलीला धडा शिकवा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्यांनी आज माझे घर फोडले

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबंधणी सुरु केली आहे. शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘जनसन्मान यात्रा’ पार पडली. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम व जावई ऋतुराज हलगेकर यांचे नाव घेत यांच्याशी आपले संबंध तुटले असे जाहीर केले. आजपर्यंत सर्व काही दिल्यावरही ते आज माझ्या विरोधात उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत. आजपर्यंत दुसऱ्यांची घरे फोडणाऱ्यांनी आज माझे पण घर फोडले असे आत्राम म्हणाले. यावेळी ते भावूक झाले होते.

हे ही वाचा…वर्धा: विधानसभेवेळी ‘ अमर ‘ पॅटर्न चालणार ? उमेदवार व मतदारसंघ अदलाबदलीचा सूर.

उमेदवारीवरूनच वादाला सुरुवात

गेली अनेक वर्ष आत्राम यांची मुलगी आणि जावई त्यांच्यासोबत राजकारणात सक्रिय होते. यादरम्यान मुलीने जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सिनेट सदस्य अशा पदावर काम केले आहे. परंतु, मागील काही दिवसापासून त्यांच्यात विधानसभा उमेदवारीवरून वाद निर्माण झाला होता. यातूनच मुलगी आणि जावई यांनी वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा आहे.

हे ही वाचा…नितीन गडकरींच्या मंत्रालयामुळे देशाला एक लाख कोटींचा तोटा? न्यायालयात याचिका… काय आहे कारण?

मुलगी आणि जावयाला नदीत बुडवा

गेल्या काही दिवसांपासून आत्राम यांची मुलगी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. असा दावा अनिल देशमुख आणि इतर नेत्यांनी केला होता. यावर आज आत्राम यांनी स्वतः शिक्कामोर्तब केले आहे. ते म्हणाले, माझी मुलगी माझी होऊ शकली नाही, ती दुसऱ्यांची कशी होऊ शकेल, असा सवाल करीत आत्राम यांनी मुलगी आणि जावयास नदीत बुडवून टाका, अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला. माझी एक मुलगी आणि जावई जरी आपल्याला सोडून जात असले तरी दुसरी मुलगी, मुलगा, भाऊ, पुतण्या हे माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला चिंता नाही, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Split in house ncp senior minister dharmarao baba atram eldest daughter join sharad pawar group ssp 89 sud 02