गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र जिल्ह्यातील खदानविरोधी आंदोलन, बळजबरी भूसंपादन, रेती तस्करी, पाचवी अनुसूची, पेसा – वनहक्क कायद्यांची अंमलबजावणी, ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न या मुद्द्यांवर ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने शेतकरी कामगार पक्षाने वेगळी भूमिका घेत आता योग्य उमेदवारासाठी काम करण्यासाठी येत्या दोन दिवसांत जिल्हा समीतीची बैठक आयोजित करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीत उभी फूट पडल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील प्रस्तावित आणि मंजूर लोह खाणींना स्थानिक ग्रामसभांच्या असलेल्या खदान विरोधी भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाने सुरुवाती पासूनच समर्थन देवून नेतृत्व केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ग्रामसभा सोबत दगाबाजी करत वेळोवेळी रोजगार मिळण्याच्या नावाखाली प्रकल्प आणि खाणींचे समर्थन केले आहे. ओबीसी आरक्षण, भटक्या जमातींचे विविध प्रश्न, पेसा-वनाधिकार, पाचवी अनुसूची, रेती तस्करी, बळजबरी भूसंपादन याबाबत जिल्ह्यात भाजपची जी भूमिका आहे, तिच भूमिका काॅंग्रेस आणि महाविकास आघाडीची असल्याने जिल्हावासीयांची दिशाभूल होत आहे. अशा परिस्थितीत सामान्य माणसाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोणासाठी काम करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा… उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

हेही वाचा…. बुलढाणा: ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस जिल्हाध्यक्षासह ११ जणांवर गुन्हे दाखल

तसेच काही उमेदवारांनी शेतकरी कामगार पक्ष आपल्यासाठी काम करणार असल्याचे गृहीत धरले असून न विचारता बॅनर, पोस्टर वर पक्षाच्या नावाचा उल्लेख करण्याचा खोडसाळपणा करीत आहेत. मात्र शेतकरी कामगार पक्ष खदानसमर्थक व ग्रामसभाविरोधी भूमिका असणाऱ्यांच्या सोबतीला जाणार नसून योग्य उमेदवारासाठी काम करण्याबाबत जिल्हा बैठक आयोजित करुन सर्व संमतीने निर्णय घेण्यात येईल असे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, जिल्हा खजिनदार शामसुंदर उराडे, जयश्री जराते, जिल्हा सह चिटणीस रोहिदास कुमरे, युवक जिल्हाध्यक्ष अक्षय कोसनकर, जिल्हा सचिव देवेंद्र भोयर यांनी कळविले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Split in india alliance in gadchiroli peasants and workers party of india criticised candidate ssp 89 asj