नागपूर : मतदार नोंदणीसाठी आयोजित केलेल्या ‘ इलेक्शन युथ फेस्टिवल ला नागपूरकर तरूणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऑक्टोबर २०२३ पर्यंत ज्या मतदारांची वयाची १८ वर्षे पूर्ण होतात, त्या सर्वांनाही या ठिकाणी नोंदणीसाठी अर्ज देण्यात आले. अनेकांची नोंदणी करण्यात आली. त्यामुळे ही मुले १८ वर्षाची पूर्ण झाल्यानंतर आपोआपच त्यांची नावे मतदार यादीमध्ये येणार आहे.
त्यामुळे या ‘इलेक्शन युथ फेस्टिवलला ‘ १७ वर्षाच्या वरती असणाऱ्या मुलांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे कनिष्ठ कॉलेजच्या विद्यार्थ्यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती. नवमतदारांनी उत्साहात नोंदणी केली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी मीनल कळसकर, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या मार्गदर्शनात साहसी क्रीडा प्रकारांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते.