वर्धा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी सारस्वतांच्या प्रकृतीची अहोरात्र काळजी घेण्यासाठी विविध पाळ्यांत शंभरावर डॉक्टरांची स्वयंस्फूर्त सेवा लाभणार आहे. सेवाग्राम येथील कस्तुरबा व सावंगीचे आचार्य विनोबा भावे रुग्णालय तसेच भारतीय वैद्यक संघटना व सामान्य रुग्णालयातील तज्ज्ञांची चमू चोवीस तास सज्ज असेल.
तीनही दिवस आरोग्य विभागाच्या दोन चमू प्राथमिक उपचारासाठी दिमतीस असतील. राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी तसेच कार्यक्रमस्थळी डॉक्टर आपल्या उपकरणांसह पाहुण्यांची काळजी घेणार आहेत. आयोजकांकडून प्राणवायू पुरवठा, गादी व अन्य वैद्यकीय साहित्य देण्यात येणार आहे. सावंगीची चमू पूर्णवेळ रुग्णवाहिका व महत्त्वाच्या उपकरणांसह सज्ज असेल. सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे भ्रमनध्वनी क्रमांक संमेलनस्थळी सर्वत्र उपलब्ध असणार आहे.