अनिल कांबळे
नागपूर : तरुणी आणि महिलांच्या मोबाईलमध्ये अचानक एक ‘लिंक’ येत असून त्या लिंकवर ‘क्लिक’ केल्यास आपोआप ‘स्पाय ॲप’ अपलोड होत आहे. ते ॲप अदृष्य स्वरुपात (हिडन) असून त्या माध्यमातून मोबाईलमधील डाटा, मॅसेज, छायाचित्र, ‘कॉल हिस्ट्री’ आणि चित्रफिती थेट सायबर गुन्हेगारांना दिसतात. त्यामुळे अनेकांच्या खासगी आयुष्याला धोका निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या अधिक सक्रिय झाल्या असून त्यांनी महिला व तरुणींना लक्ष्य केले आहे. तरुणी व महिलांच्या मोबाईलमध्ये अचानक काही लिंक येतात. त्या लिंकमध्ये दागिणे, साड्या, स्वस्त कपडे, घरातील भांडी आणि शोभेच्या वस्तू यासह घरातील दैनंदिन कामाच्या वस्तू अगदी स्वस्त दरात दाखविण्यात येतात. त्यामुळे अनेक महिला-तरुणी वस्तू बघण्यासाठी किंवा उत्सूकतेपोटी लिंकवर ‘क्लिक’ करतात. त्या लिंकमध्ये छायाचित्रांचा वापर काही वस्तू आणि त्याच्या किंमती दिलेल्या असतात. वस्तू खरेदी करण्यासाठी अर्ज भरा, माहिती भरा आणि बँके अकाऊंटला लॉगीन करा अशी खूप किचकट प्रक्रिया असल्यामुळे कुणीच त्या भानगडीत पडत नाहीत. परंतू, त्या लिंकवर क्लिक करताच आपल्या मोबाईलमध्ये एक अदृष्य स्वरुपाचे ‘स्पाय ॲप’ आपोआप ‘इंस्टॉल’ होते. त्याचा ‘आयकॉन’ही मोबाईलच्या ‘स्क्रिन’वर दिसत नाही. त्यामुळे मोबाईल वापरताना कुणालाही संशय येत नाही. नेहमीप्रमाणे मोबाईल वापरता येतो. मात्र, या अॅपमुळे आपल्या खासगी आयुष्याला धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>>…अन् जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हातात घेतला झाडू, वाचा कारण काय ते…
‘ॲप’चे धोके काय
स्पाय अँप मोबाईलमध्ये डाऊनलोड झाल्यास मोबाईलचे लोकेशन, मोबाईलमध्ये काढलेले प्रत्येक छायाचित्र, चित्रफित, पाठवलेले आणि आलेले मॅसेज, ईमेल, व्हॉट्सअँपवरील सर्व मॅसेज, छायाचित्र, चित्रफित, इंस्टाग्रामवरील मॅसेज असे अन्य प्रकारच्या खासगी गोष्टी सायबर गुन्हेगाराला दिसतात. आक्षेपार्ह छायाचित्र, मॅसेज किंवा चित्रफित मोबाईलमध्ये असल्यास सायबर गुन्हेगार ब्लॅकमेल करू शकतात.
हेही वाचा >>>जावई बापूंना चांदीच्या ताटात सोन्याचा घास, पण अनारसे देतात भलताच ताप…
मोबाईल दुरुस्तीला देताना सावधान
सायबर गुन्हेगारांना आर्थिक फायदा हवा असतो म्हणून मोबाईलमध्ये ‘स्पाय अॅप’ अपलोड करतात. परंतु, शहरातील दुकानात मोबाईल दुरुस्तीला दिल्यानंतर ‘ब्लॅकमेल’ करण्यासाठी ‘स्पाय ॲप’ टाकण्यात येते. मोबाईल दुरुस्ती करणारे युवक फोटो आणि मॅसेज व्हायरल करण्याची धमकी देऊन किंवा काही खासगी नाते, खासगी आयुष्याबाबत त्यांच्या कुटुंबियांना सांगण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करतात.
मोबाईल दुरुस्तीला देताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. तसेच सायबर गुन्हेगारांकडून अनेकदा लिंक येत असतात. त्यावर क्लिक करु नये. अन्यथा ‘मोबाईल हॅक’ होणे किंवा मोबाईलचा ताबा गुन्हेगारांकडे जाण्याची शक्यता असते. – ईश्वर जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे.