नागपूर : रामनवमीनिमित्त रविवारी नागपुरातील ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिरातून श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेला राममय वातावरणात सुरुवात झाली. नागपूरच्या समृद्ध परंपरेचा भाग म्हणून शहरातील शोभायात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. यात दरवर्षी लाखोच्या संख्येत रामभक्त सहभागी होतात. अनेक वर्षाची परंपरा आणि नागपूरची विशेष ओळख ठरलेल्या श्रीराम शोभायात्रा सर्वधर्म समभावाची प्रतीक मानली जाते.

मुस्लिम धर्मीय या शोभा यात्रेच्या स्वागताला येतात. मार्च महिन्यात नागपूर हिंसाचारानंतर अतिशय चौख सुरक्षा व्यवस्थेत ही शोभायात्रा काढण्यात आली. मध्य नागपुरातील ज्या भागात हिंसाचार झाला होता त्याच परिसरातून या शोभायात्रेचा मार्ग असल्याने पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.

९० चित्ररथांचा समावेश

रविवारी मंदिरातील रामाच्या मूर्तीचे पूजन केल्यावर प्रमुख रथात विराजमान करण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते श्रीराम पंचायतनाचे पूजन होऊन शोभायात्रेला प्रारंभ झाला.

शोभायात्रेत स्केटींग पथक, प्रतिहारी दल, अश्वमेधाचा घोडा, शंखनाद दल, भजन मंडळी, नटराज क्रिडा मंडळाचे आदिवासी नृत्य, रामायण मंडळ, राम संकीर्तन दल, जस गायन आदींसह , बांकेबिहारी दर्शन, महालक्ष्मी जगदंबा कोराडी दर्शन, पंचमुखी हनुमान, बैद्यनाथ ज्योतिर्लींग दर्शन, केदारनाथ धाम, महाकाली दर्शन, स्वामी समर्थ दर्शन, बालाजी दर्शन, कुंभकर्ण निद्रा, विष्णू अवतार, राधाकृष्ण सिंहासन, प्रयागराज महाकुंभ, वाल्मिकी रामायण रचना, शिवपार्वती विवाह, महर्षी सुदर्शन यांची आराधना, मारीच वध, तुळजा भवानी गोंधळ, महाकाल दर्शन, राम पंचायतन सजीव झांकी, गौमाता राजमाता दर्शन, नरसिंह अवतार, तुलसी रामायण कथा, भक्तीलीन हनुमान हे प्रमुख ९० चित्ररथ राहणार आहेत.

शोभायात्रेच्या व्यवस्थेसाठी संपूर्ण मार्गावर स्वागतद्वार, कमानी, रामायणातील देखावे, दिव्यांची रोषणाई, संपूर्ण मार्गावर शोभायात्रेचे समालोचन करण्यात आली आहे . ही शोभायात्रा पोद्दारेश्वर राम मंदिर, हंसापुरी, बजेरीया, गोळीबार चौक, मार्गे इतवारी, सराफा बाजार, चितारओळ, बडकस चौक, केळीबाग रोड, शिवाजी चौक, टिळक पुतळा, शुक्रवारी तलाव, कॉटनमार्केट चौक, लोखंडी पुल, आनंद टॉकिज, मुंजे चौक, झांशी राणी चौक, व्हेरायटी चौक, मानस चौक मार्गे पुन्हा मंदिरात परतणार आहे.

पहिल्यांदाच कोराडी जगदंबा संस्थानाचा चित्ररथ

या शोभायात्रेचे यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या वर्षी प्रथमच  महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी यांच्या चित्ररथाचा समावेश करण्यात आला आहे. नागपूरला लागूनच असलेल्या कोराडी देवस्थानाचा नागपूरच्या शोभायात्रेशी संबंध नव्हता. पण या देवस्थानाची सुत्रे भाजपचे आमदार, प्रदेशाध्यक्ष व विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहेत. त्यामुळे यंदा नागपूरच्या शोभायात्रेत कोराडीच्या देवस्थानाचा सहभागी झाले आहे. विविध प्रकारचे आकर्षक चित्ररथ हे नागपूरच्या शोभायात्रेचे वैशिष्ट्य आहे.