नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेसाठी केलेले सर्व दावे शुक्रवारी पहिल्या दिवशी फोल ठरले आहे. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटला आहे. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आली. त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालन्यात घडलेल्या या प्रकरणानंतर यवतमाळमध्ये असाच प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात २१ फेब्रुवारी २०२५ पासून दहावीची परीक्षा सुरू झाली. तर परीक्षेला १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली, तर १९ ट्रान्सजेंडर परीक्षा देत आहेत. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. तर ५ हजार १३० मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. त्यानंतर जालना येथे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा प्रकार घडाला. या ठिकाणी असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना पुरवला गेला. जालना शहरातील छायांकित प्रत केंद्रातून उत्तरपत्रिकांच्या छायाकित प्रत काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पालक संतप्त झाले. त्यानंतर आता यवतमाळमध्येही अचाच प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
केंद्रावर उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत?
राज्य मंडळाने कॉपीमुक्त परीक्षा करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. पंरतु प्रत्येक परीक्षेमध्ये गोंधळाच्या घटना समोर येत आहेत. त्यानंतर पहिल्याच दिवशी दहावीच्या पेपरमध्ये गैरप्रकार झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी जालन्यामध्ये आणि त्यानंतर आता यवतमाळमध्ये पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. जालन्यात दहावीचा मराठीचा पेपर फुटला. सकाळी ११ वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत होती. जालना जिल्ह्यात १०२ परीक्षाकेंद्रावर जवळपास ३२ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा आहे. आता हा पेपर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कुठे कुठे पर्यंत पोहचला, त्याची चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे.