यवतमाळ : राज्यात आज सर्वत्र दहावीची परीक्षा सुरू झाली. ही परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शासन खबरदारी घेत असताना यवतमाळ जिल्ह्यात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला. महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयात पेपर सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सऍपवर व्हायरल झाली. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात १५९ केंद्रांवर आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. जिल्ह्यातील ३८ हजार ९८५ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. आज मराठी विषयाचा पहिलाच पेपर होता. महागाव तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालयात परीक्षार्थी पेपर देण्यासाठी केंद्रात गेले असताना बाहेर मराठीची प्रश्नपत्रिका काहींच्या व्हाट्सअपवर आल्याची चर्चा सुरू झाली.
त्यामुळे पेपर सुरू होण्यापूर्वीच पेपर फुटल्याच्या चर्चेने महागाव तालुक्यात जोर पकडला. पेपर सुरू होवून १०, १५ मिनिटेही व्हायची असताना प्रश्नपत्रिका अनेकांच्या व्हाट्सअपवर आली. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.
हा प्रकार शिक्षणाधिकारी, महसूल, पोलीस विभागास कळताच या विभागाचे अधिकारी परीक्षा केंद्रावर दाखल झाले. या केंद्रावर परीक्षा सुरळीत झाली मात्र शिक्षण विभागाने तत्काळ चौकशी सुरू केली.
शिक्षणाधिकारी, महागावचे तहसीलदार आदर्श विद्यालयात पोहाचले. त्यांनी सर्व बाजूंनी माहिती घेत चौकशी सुरू केली. या संदर्भात या परीक्षा केंद्रावर ज्यांच्या कस्टडीतून प्रश्नपत्रिका दाखल झाल्या ते कस्टडीयन तथा शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेटेवाड यांना विचारणा केली असता, आदर्श विद्यालयात पेपर फुटल्याची माहिती दुपारी १२ वाजता समाजमाध्यमातून कळल्याचे त्यांनी सांगितले.
याची गंभीर दखल घेत तत्काळ शिक्षणाधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनास कळविण्यात आले. सर्व अधिकारी परीक्षा केंद्रावर दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. ही प्रश्नपत्रिका बाहेर कशी गेली हे चौकशीअंती कळेल, तोपर्यंत काही सांगता येणार नाही, असे बेटेवाड म्हणाले.
दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त , भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत शिक्षणमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षा अभियान शासनाने हाती घेतले आहे.
या अभियानात जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले होते. मात्र दहावीचा पहिलाच पेपर फुटल्याने या अभियानाचा फज्जा उडाला आहे.
प्रश्नपत्रिका फुटलेली आदर्श शाळा आरटीओची
महागाव तालुक्यात दरवर्षी बहुतांश परीक्षा केंद्रांवर खुलेआम कॉपी चालतात. यावर्षी शासनाच्या कॉपीमुक्त अभियानामुळे या प्रकारास आळा बसेल अशी आशा अभ्यासू विद्यार्थी व त्यांच्या पालकांना होती. मात्र ही अपेक्षा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी फोल ठरली. आज प्रश्नपत्रिका फुटली ते कोठारी येथील आदर्श विद्यालय हे एका उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचे (आरटीओ)असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या शाळेवर शासनाच्या धोरणाप्रमाणे कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.