महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर : एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँक अडचणीत सापडली आहे. गेल्या दीड वर्षात बँकेतील सुमारे ५०० कोटींच्या ठेवी काढल्याने येथील सभासदांच्या कर्ज पुरवठ्याला स्थगिती देण्यात आली आहे.
एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँकेच्या राज्यभरात ५० शाखा आहेत. याच बँकेतून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनही होते. या बँकेत दीड वर्षांपूर्वी २,३०० कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. जून २०२३ मधील निवडणुकीत सदावर्ते पॅनलच्या उमेदवारांनी एस. टी. कामगार संघटनेच्या उमेदवारांचा पराभव केला. सदावर्ते पॅनलने सभासदांना कर्जावरील व्याज दर ११ टक्यांवरून ७.५ टक्के करण्याचे आश्वासन दिले होते. सत्तास्थापनेनंतर व्याजदर ७.५ टक्के करण्यात आले. त्यानंतर ठेवीदारांनी बँक अडचणीत येण्याचा धोका असल्याचे सांगत सुमारे ५०० कोटींच्या ठेवी काढून घेतल्या. यामुळे संचालक मंडळाने व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेतला.
आणखी वाचा-दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार? काय आहे कारण? वाचा…
या गोंधळात बँकेतील २,३०० कोटींच्या ठेवी कमी होऊन १,७०० कोटींवर आल्या. त्यामुळे बँकेतील क्रेडिट- डिपॉझिट रेशो (सीडी रेशो) ९४ टक्क्यांवर गेला. हा रेशो वाढला म्हणजे बँकेत १०० रुपयांच्या ठेवीपैकी तब्बल ९४ रुपयांचे कर्ज दिले गेले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे कर्ज ठेवीच्या ७० टक्क्यांहून जास्त नको. या प्रकारामुळे कर्ज पुरवठ्याला प्रशासनाने स्थगिती दिली. आता येथे केवळ ५ हजार रुपयापर्यंतच काढता येतात. कर्जच मिळत नसल्याने सभासदांमध्ये नाराजी आहे.
आणखी वाचा- ‘लुटेरी दुल्हन!’ ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी बळजबरी लग्न, १७ लाख उकळले
“मध्यंतरी ठेवी कमी झाल्याने बँक अडचणीत आली होती. आता रोज २ ते ३ कोटींच्या ठेवी येत आहेत. सुमारे एक महिन्यात स्थिती सामान्य होईल. १९ मार्चला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी मुंबई शाखेत आले. त्यावेळी रेपो दराव्यतिरिक्त इतर सगळेच निकष चांगले आढळले. ठेवी वाढल्यावर स्थगित कर्ज देणे पुन्हा सुरू होईल.” -एस.एम. खान, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँक.
“बँकेत सध्या ५ हजारांच्या ओव्हर ड्राफ्टशिवाय इतर कर्ज मिळत नाही. त्यामुळे सभासदांनी आर्थिक अडचणीत कर्ज घ्यायचे कुठून हा प्रश्न आहे. बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे.” -अजय हट्टेवार, राज्य उपाध्यक्ष, एस.टी. कामगार संघटना.