अमरावती : अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळविहीर ते सावर्डीदरम्यान एका भरधाव एसटी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३२ प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचून रुग्णांची विचारपूस केली.
नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळविहीर ते सावर्डी या गावांदरम्यान आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, नागपूर ते अकोट जाणारी एमएच ४०/ एक्यू ६४३३ क्रमांकाच्या एसटी बसने पिंपळविहीर ते सावर्डीदरम्यान समोर असलेल्या एमएच २०/ बीटी ७२८८ क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. यावेळी एसटी बसमधून ३५ ते ४० प्रवासी प्रवास करीत होते. अपघातात बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. नांदगावपेठ पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकाने लगेच घटनास्थळ गाठून सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३२ प्रवासी उपचारासाठी दाखल झाले असून, हे सर्व प्रवासी किरकोळ जखमी आहेत. अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात जाऊन अपघाताची माहिती घेतली आणि रुग्णांची विचारपूस केली.