अमरावती : अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळविहीर ते सावर्डीदरम्यान एका भरधाव एसटी बसने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३२ प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचून रुग्णांची विचारपूस केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळविहीर ते सावर्डी या गावांदरम्यान आज दुपारी १२ वाजताच्‍या सुमारास हा अपघात घडला. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, नागपूर ते अकोट जाणारी एमएच ४०/ एक्यू ६४३३ क्रमांकाच्या एसटी बसने पिंपळविहीर ते सावर्डीदरम्यान समोर असलेल्या एमएच २०/ बीटी ७२८८ क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. यावेळी एसटी बसमधून ३५ ते ४० प्रवासी प्रवास करीत होते. अपघातात बहुतांश प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा – चंद्रपूर: कर्जबाजारी शेतकऱ्याच्या मुलीचा महिला सशक्तीकरणासाठी ९,१६५ किमी सायकलने प्रवास; वाचा थक्क करणारी कहाणी

हेही वाचा – चंद्रपूरकरांसाठी अभिमानाची बाब; राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये तृतीयपंथी निधी करणार महाराष्ट्राचे नेतृत्व

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. नांदगावपेठ पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकाने लगेच घटनास्थळ गाठून सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३२ प्रवासी उपचारासाठी दाखल झाले असून, हे सर्व प्रवासी किरकोळ जखमी आहेत. अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयात जाऊन अपघाताची माहिती घेतली आणि रुग्णांची विचारपूस केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St bus hit truck from behind in amravati 32 passengers injured mma 73 ssb