संजय मोहिते, लोकसत्ता
बुलढाणा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘महिला सन्मान योजना’ मुळे एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस शुक्रवार पासून ‘हाऊस फुल्ल’ झाल्याचे चित्र आहे. जेमतेम दोन दिवसांत मंडळाला सुमारे सव्वा अकरा लाखांचे घसघशीत उत्पन्न मिळाल्याने बुलढाणा विभागाचे अधिकारी सुखावल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाने ७५ वर्षाखालील महिलांना महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस मध्ये ५० टक्के भाडे सवलत लागू केली आहे. याची अंमलबजावणी १७ मार्चपासून झाली असून बुलढाणा एसटी विभागात महिलांनी याचे जोरदार स्वागत केल्याचे पहिल्या दोन दोन दिवसातच दिसून आले. १७ तारखेला जिल्ह्यातील ७ आगारातून १४ हजार ३७२ महिलांनी या योजने अंतर्गत प्रवास केला. पहिल्या दिवशी विभागाला २ लाख ९४ हजार ३९७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये मलकापूर आगार आघाडीवर होते.
आणखी वाचा- यवतमाळ: जिल्हा परिषदेच्या ५६ विद्यार्थ्यांना मिळाली हवाईसफर करण्याची संधी
दरम्यान, दुसऱ्या दिवशीच महामंडळाच्या या सन्मानाचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जवळपास अडीचपट जास्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १८ तारखेला ३५३४५ महिलांनी एसटीचा सन्मान स्वीकारला. यातही मलकापूर आगार आघाडीवर राहिले. त्याखालोखाल बुलढाणा, शेगाव, चिखली, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद असा आगारनिहाय क्रम आहे. दुसऱ्या दिवशीच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली असून तो आकडा ८लाख २८ हजार ११५ रुपये इतका आहे. केवळ दोनच दिवसात जवळपास अर्धा लाख(४९, ७१७) महिलांनी लाभ घेतला असून ११ लक्ष २२ हजार ५१२ रुपयांची भर महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे.