बुलढाणा: पृथ्वीतलावरील वैकुंठ असलेल्या पंढरपूरचा राणा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो, अशी लाखो भाविकांची श्रद्धा आहे. यामुळे विठुमाऊली हजारो भक्तांना आषाढीची वारी घडविणाऱ्या एसटी महामंडळाला तरी कसे नाराज करणार? यंदाही एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाला तब्बल १ कोटी ३४ लाखांचे घसघशीत उत्पन्न मिळाले आहे.
अनेक वर्षांनंतर महामंडळाचा बुलढाणा विभाग फायद्यात आहे. जून महिन्यातही विभागाचा आलेख उंचावलेलाच होता. यात आता आषाढी एकादशी यात्रेची भर पडली. यासाठी विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज नियोजन करण्यात आले होते. सवलतीसह उत्पन्न गृहीत धरले तर बुलढाणा विभागाला आषाढी वारीतून १ कोटी ३४ लाख ८२ हजार १७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
हेही वाचा… राजकीय भडका उडणार! आमदार राजेंद्र शिंगणेंच्या संभाव्य लाल दिव्याला शिवसेना शिंदे गटाचा तीव्र विरोध
२५ जून ते ४ जुलैदरम्यान बुलढाणा विभागाच्यावतीने तब्बल २ लाख ७९ हजार ९१० किलोमीटर अंतर कापून ७२ हजार १८५ भाविकांची येजा करण्यात आली. बुलडाणा, चिखली, खामगाव, मलकापूर, जळगाव, शेगाव व मेहकर बस आगारातून ही वाहतूक करण्यात आली. प्रामुख्याने चालक, वाहक व संबंधित कर्मचारी, कामगारांच्या परिश्रमाने विभागाला सव्वाकोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळाले.
बुलढाणा, मेहकर आगार आघाडीवर
मेहकर आगार १३ लक्ष ७३ हजार रुपये उत्पन्नासह आघाडीवर आहे. ५३२७१ भाविकांची ने-आण करण्यात आली. बुलढाणा आगाराने ५५३५९ भाविकांची वाहतूक करून १३ लाख ११ हजार रुपये उत्पन्न मिळविले आहे.