लोकसत्ता टीम
नागपूर: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ९ एप्रिलचा दिवस उजाडल्यावरही वेतन नाही. त्यातच आता महामंडळाने आर्थिक कोंडीचे कारण देत मार्च महिन्याचे ५६ टक्केच वेतन कर्मचाऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. शिल्लक रकमेबाबतही तोंडी आदेशात काही स्पष्ट नाही. त्यामुळे एसटी कामगारांच्या विविध संघटना संतापल्या आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला महामंडळाकडे सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम वर्ग केली जातो. पण गेले अनेक महिने मागणी प्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात अडचणी येत आहे. यंदा कमी निधी मिळाला असतांनाच महामंडळाकडून एसटी बँकेला ४० कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांच्या कर्जापोटी द्यावी लागली. त्यामुळे महामंडळाकडे निधीची कोंडी जास्तच वाढली.
एसटी कर्मचाऱ्यांचे पी. एफ., ग्र्याजुटी, बँक कर्ज, एल. आय. सी., अशी साधारण ३ हजार ५०० कोटी रुपयांची देणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन सुद्धा महामंडळाकडून संबंधिक संस्थांकडे वर्ग केली गेली नाही. एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांसह इतरांना देणी असलेली थकीत देणी सात हजार कोटी रुपयांवर गेली आहे. यंदा महामंडळाने शासनाकडे मार्च महिन्याच्या वेतनासह इतर थकीत देणीसाठी ९२५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. परंतु २७२ कोटी ९६ लाख रुपयेच मिळाले. त्यातील ४० कोटी रुपये कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेडीसाठी महामंडळो एसटी बँकेकडे वर्ग केला.
त्यामुळे ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनापैकी केवळ ५६ टक्केच निधी दिला जाणार आहे. त्यामुळे हा कमी वेतन बुधवार वा गुरूवारी मिळण्याचे संकेत आहे. त्याबाबतच्या सूचना महामंडळातर्फे सर्व विभाग नियंत्रकांना मिळाल्या आहे. शिल्लक वेतनाबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाणार असल्याचे एसटी अधिकारी सांगत आहे. दरम्यान इतक्या विलंब झाल्यावर आता कमी वेतन मिळणार असल्याने एसटी कामगारांच्या संघटना संतापल्या आहे. काहींनी आंदोलनाची तयारीही केली आहे. यंदा नागपुरातील एसटी कर्मचाऱ्यांना ५६ टक्केच वेतन अदा केले जाणार असल्याच्या वृत्ताला एसटीच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.
कामगार संघटना काय म्हणते?
सरकार एसटी महामंडळाच्या आर्थिक कोंडीवर उपाय शोधत नसतांनाच आता कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडणार आहे. हे कर्मचाऱ्यांचे शोषन आहे, असा आरोप महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला. एसटी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार म्हणाले, रखरखत्या उन्हात सेवा दिल्यावरही एसटी कर्मचाऱ्यांना कमी पगार देणे चुकीचे आहे. या विषयावर कामगारांच्या न्यायासाठी आंदोलन केले जाईल.