नागपूर : ST Employee Strike मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्यांवरून ३८ टक्के केला; परंतु कामगार कराराप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्के अपेक्षित आहे. त्यामुळे या वाढीव दराने महागाई भत्ता आणि इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी ११ सप्टेंबरपासून मुंबईत, तर त्यानंतर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यात आमरण उपोषण करणार आहेत.
मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून अद्यापही सरकारला त्यावर तोडगा काढला आला नाही. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचीही त्यात भर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेने एसटी महामंडळाला शुक्रवारी आंदोलनाची नोटीस दिली. महामंडळासह शासनाकडे संघटनेकडून एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ४२ टक्के महागाई भत्ता थकबाकीसह देण्याची मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> वंशावळ शब्द वगळण्यास सरकार तयार? जरांगेंनी आंदोलन तीव्र केल्याने निर्णय
एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी, एप्रिल २०१६ ते सप्टेंबर २०२१ पर्यंतची घरभाडे भत्त्याची थकबाकी द्या व मूळ वेतनात जाहीर केलेल्या रकमेने सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेली तफावत दूर करा, सातवा वेतन आयोग द्या, गणवेशाचे कापड वाढीव शिलाई भत्त्यासह द्या, भंगार बसेस काढून टाका, कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारच्या एस.टी. बसेसमध्ये मोफत पासची सुविधा द्या, अशा मागण्या करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
हेही वाचा >>> परिक्रमा यात्रेच्या स्वागत फलकावर पंकजा मुंडेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख!
एसटीतील कामगार करारानुसार कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांएवढाच म्हणजे ४२ टक्के महागाई भत्ता मिळायला हवा; परंतु शासन कमी भत्ता देऊ पाहत आहे. सोबत इतरही अनेक मागण्या वर्षांनुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे नाइलाजाने हे आंदोलन करावे लागत आहे. – संदीप शिंदे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना