लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून वारंवार एसटी महामंडळ आणि शासनाला एसटी कामगारांच्या विविध प्रलंबित आर्थिक व इतर मागण्यांबाबत निवेदन देत वेळोवेळी आंदोलनाचा इशाराही दिला गेला. शेवटी मागणी मान्य न झाल्याने नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात एसटीचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर बसले आहे. कामगारांनी यावेळी एसटी महामंडळ व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.

संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष अजय हट्टेवार म्हणाले, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ यांची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसात मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये शासनाने मान्य केले होते. परंतु ४ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप बैठक झाली नाही. शासनाला वारंवार कामगारांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती करत आंदोलनचा इशाराही दिला गेला. परंतु, शासन काही करत नसल्याने एसटी कामगार संतप्त झाले आहेत.

आणखी वाचा-धक्कादायक! आईला मारहाण केल्याच्‍या राग, मुलाने केली वडिलांची हत्या…

शासन काही करत नसल्याने नाईलाजाने हे आंदोलन करावे लागत आहे. यावेळी शासनाला एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी द्यासह इतरही मागणी केली जात आहे. दरम्यान १३ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाबाबत संघटनेनेने १ जानेवारीला एसटी महामंडळाला नोटीसही दिली होती. परंतु त्यानंतरही मागण्यांबाबत काही झाले नसल्याने हे आंदोलन सुरू झाल्याचेही हट्टेवार म्हणाले. या मागण्यांबाबत राज्य सरकार, प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, तर एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह कामगार सहभागी झाले होते.

आणखी वाचा-चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून पहिल्या टप्यात बेमुदत उपोषण राज्यातील सगळ्याच विभागीय कार्यालय परिसरात सुरू करण्यात आले आहे. त्याची शासनाने दखल न घेतल्यास दुसऱ्या टप्यात प्रसंगी संपाचाही इशारा संघटनेकडून एसटी महामंडळासह शासनाला दिला गेला आहे. हा संप झाल्यास एसटी बसची चाके थांबून सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मन:स्ताप होण्याचा धोका व्यक्त होत आहे. त्यामुळे शासन या आंदोलनाला गांभिर्याने घेऊन संघटनेशी चर्चा कधी करणार? याकडे सगळ्या राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St employees on indefinite hunger strike in nagpur mnb 82 mrj