नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ऐन दिवाळीच्या तोंडावर ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान प्रवास शुल्क दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार एसटीच्या साध्या शयनयान बसने नागपूर- पुणे प्रवासासाठी आता तब्बल १६० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे.
नागपूर ते पुणे दरम्यान पूर्वी साध्या शयनयान बसचे प्रवास शुल्क १ हजार ५९५ रुपये होते. दरवाढीनंतर हे शुल्क १ हजार ७५५ रुपये झाले आहे. तर शिवशाहीने पूणे जाण्यासाठी पूर्वी १ हजार ५३० रुपये लागत होते आता हे शुल्क १ हजार ६८५ रुपये झाले आहे. साधारण बसमध्ये पूर्वी १ हजार ८० रुपये लागत होते. हे शुल्क आता १ हजार १९० रुपये झाले आहे. नागपूर ते छत्रपती संभाजीनगर प्रवासासाठी पूर्वी साधारण बसमध्ये ७४० रुपये लागत होते. हे भाडे आता ८१५ रुपये लागत आहे.
शिवशाहीने प्रवासासाठी पूर्वी १ हजार ५० रुपये लागत होते. आता हे शुल्क १ हजार १५५ रुपये झाले आहे. तर साधी शयनयानने प्रवासासाठी पूर्वी १ हजार ९५ रुपये लागत होते. हे शुल्क आता १ हजार २०५ रुपये झाले आहे. तर नागपूरहून इतरही भागात जाण्यासाठी विविध बसचे भाडे सुमारे १० टक्यांनी वाढल्याची माहिती एसटी महामंडळाकडून दिली गेली आहे.