चालकाला विश्रांतीसाठी शेवटच्या आसनावर विशेष व्यवस्था
एसटी महामंडळाच्या वतीने प्रवास आरामदायी करण्याकरिता बसेसमध्ये बरेच बदल करण्यात आले. त्यानुसार महामंडळाच्या हिगणा मार्गावरील कार्यशाळेला नुकत्यात बांधणीकरिता पोहोचलेल्या नवीन बसमध्ये एक ऐवजी दोन संकटकालीन दरवाजे, बसच्या टपावरील लगेज कॅरियर काढून आसना खालच्या भागात सामान ठेवण्याची व्यवस्था, बस चालकाच्या विश्रांतीसाठी शेवटच्या आसनावर झोपण्याची विशिष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास आणखी सुखकर होण्याचा एसटीचा दावा आहे.
महाराष्ट्रात मोठय़ा शहरांपासून लहान व मागासलेल्या खेडय़ांपर्यंत रोज हजारोंच्या संख्येत ‘एसटी’च्या बसेस धावत आहेत. सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून ‘एसटी’कडे बघितले जाते. एसटीच्या पूर्वीच्या बसेसमध्ये प्रवाशांच्या बसण्याकरिता योग्य व्यवस्था नसणे, बसच्या टपावर लगेज कॅरियर असल्याने प्रवासात सतत लगेजचा खडखड आवाज होण्यासह अनेक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत होता. परंतु, त्यानंतरही एसटीच्या बसेस ग्रामीण, मागासलेल्या तसेच नक्षलग्रस्त भागात धावत आहेत. प्रत्येक प्रवाशाचा विमा असल्याने प्रवाशी एसटीलाच पसंती देतांना दिसतात. एसटीचा अपघात झाल्यास प्रवाशांना बसमधून तातडीने बाहेर पडण्याकरिता आपातकालीन द्वार व एक खिडकी उपलब्ध आहे.
गर्दीच्या काळात काही प्रवासी या आपातकालीन द्वारातून आत शिरण्याची सर्कस करतानाचेही चित्र अनेक भागात बघायला मिळते. या गडबडीत कुणी प्रवासी खाली पडून जखमीही होताना दिसतात. हा प्रकार थांबवण्याकरिता एसटीने आपातकालीन द्वाराच्या खिडकीच्या कोंडय़ाला प्रथमच रेल्वेच्या धर्तीवर विशिष्ट काच बसवले आहेत. अपघातानंतर प्रवाशांना हा काच फोडून कोंडा उघडून खिडकीच्या बाहेर पडता येईल. तेव्हा कुणी प्रवासी मधातच या आपातकालीन खिडकीतून बसमध्ये शिरण्याचा प्रकार नवीन बसमध्ये संपुष्टात येईल.
प्रवाशांचा त्रास कमी करण्याकरिता बसेसमध्ये इतरही काही बदल केल्या गेले. त्यानुसार एसटी महामंडळाच्या िहगणा मार्गावरील नवीन कार्यशाळेत बांधणीकरिता आलेल्या नवीन बसेसमध्ये आपातकालीन द्वारांची संख्या दोन झाली आहे. बसचालकाच्या मागच्या भागाला एक द्वार तर शेवटच्या आसनाच्या भागात दुसरे लावलेले आहे. या बदलामुळे प्रवाशांची सुरक्षा वाढेल. बसच्या खालच्या भागात स्टेपनीची व्यवस्था असून खालच्या भागातील मोठय़ा डिक्कीतच प्रवाशांच्या लगेज ठेवण्याची व्यवस्था असणार आहे.
नवीन एसटी गाडय़ांमध्ये संकटकालीन दोन दरवाजे
एसटी महामंडळाच्या वतीने प्रवास आरामदायी करण्याकरिता बसेसमध्ये बरेच बदल करण्यात आले.
Written by मंदार गुरव
आणखी वाचा
First published on: 18-11-2015 at 00:53 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St launch new model of bus