नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नागपूर विभागाला माहितीच्या अधिकारातून विविध माहिती संख्येत मागितली असता महामंडळाने या माहितीसाठी एक हजारांवर झेराॅक्सचा खर्च दाखवत २ हजार ३४९ रुपये भरायला सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर हे सातत्याने माहितीच्या अधिकारात केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध विभाग, महामंडळांची माहिती पुढे आणत असतात. त्यांच्या माहितीवरून बऱ्याच विभागातील अनियमितताही उघड झाल्या आहेत. कोलारकर यांनी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाला माहितीच्या अधिकारात एसटीने नागपूर विभागात किती प्रवाशांनी प्रवास केला, महसूल किती मिळाला, महिला सन्मान योजना लागू झाल्यापासून किती महिलांनी प्रवास केला, त्यातून किती उत्पन्न मिळाले, किती बस उपयोगात असून किती नादुरुस्त आहेत, अपघात किती झाले, त्यातील मृत्यू किती, नागपूर विभाग किती लाभ वा तोट्यात आहे, ही माहिती मागितली. त्यावर महामंडळाने त्यांना १ हजार ९२ प्रतींच्या झेराॅक्सचा खर्च २ हजार १८४ रुपये आणि शीघ्र टपालाचा खर्च १६५ रुपये असे एकूण २ हजार ३४९ रुपये भरायला सांगितले. ही रक्कम भरल्याशिवाय माहिती मिळणार नसल्याचेही कळवले. त्यावर कोलारकर यांनी एसटीचे सदर कार्यालय गाठत यापूर्वीही तुम्ही मला या पद्धतीची माहिती एका कागदावर संख्येत दिल्याचे सांगत मी झेराॅक्स प्रतीची मागणी केली नसल्याचे सांगितले. परंतु, म्हणणे ऐकून घेतले गेले नाही, अशी कोलारकरांची तक्रार आहे. ते या प्रकरणाची आता राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार करणार आहेत.

हेही वाचा – तीन दिवसा आधीच होणार बँक कर्मचारी वेतनवाढीचा करार, काय आहे कारण?

हेही वाचा – गडचिरोली-चिमूर लोकसभेचा तिढा वाढला; संघपरिवाराकडून नव्या नावाच्या आग्रहाने महायुतीपुढे पेच!

एसटीचा नागपूर विभाग नियमानुसारच काम करतो. या प्रकरणाची मला माहिती नाही. मी आपल्याशी भ्रमणध्वनीवर बोलणार नाही. – रं. म. घोडमारे, जन माहिती अधिकारी, एसटी महामंडळ, नागपूर विभाग.

Story img Loader