नागपूर: उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत (एसटी) जादा वाहतूक करण्यात येणार आहे. उन्हाळी जादा वाहतूकीसाठी दररोज लांब पल्ल्याच्या ७६४ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे बच्चा कंपनीला यंदाच्या सुटीत मामाच्या गावाला जाण्यासाठी चांगली सोय उपलब्ध होणार आहे.
राज्यात दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक १५ एप्रिल २०२५ ते दिनांक १५ जून २०२५ पर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त जादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेस ची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून , त्या ऐवजी लांब पल्ल्याच्या फेऱ्या सुरू केल्या जातात.
उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दी हेाणाऱ्या मार्गावर दि.१५ एप्रिल,२०२५ पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयमार्फत राज्यातील विविध मार्गावरील ७६४ जादा फेऱ्यांना मंजूरी देण्यात आली असून, या जादा फेऱ्यांव्दारे दैनंदिन ५२१ नियतांव्दारे २.५० लाख किमी चालविण्यात येणार आहे.
उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, प्रवाशांच्या सोयीसाठी रा.प.महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट http://www.msrtc.maharashtra.gov.in वर तसेच npublic.msrtcors.com या सकेतस्थळावर व मोबाईल ॲपव्दारे या बरोबरच रा.प.महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या मार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र रा. प. महामंडळाव्दारे करण्यात येत आहे.