बुलढाणा : वर्षानुवर्षे  रखडलेल्या विविध  प्रलंबीत मागण्याकडे  राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी  महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ( महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना ) च्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या वतीने  बुधवारी, पाच मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला  बुलढाणा जिल्ह्यात उत्साही प्रतिसाद मिळाला आहे

जिल्ह्यातील  सात एसटी बस आगारात एसटी कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. बुलढाणा येथे आंदोलनाची तीव्रता  जास्त असल्याचे दिसून आले. बुलढाणा एसटी विभागाचे मुख्यालय असलेल्या  बुलढाण्यात  मलकापूर राज्य महामार्गवरील  विभाग नियंत्रक कार्यालय, विभागीय  कार्यशाळा यासह  बुलढाणा बस आगार येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या गगनभेदी घोषणांनी  ही कार्यालये दुमदुमली. आंदोलनात महिला कर्मचाऱ्यांचा उत्साह आणि सहभाग लक्षवेधी ठरला. एसटी कामगार संघटनेचे बुलढाणा विभागीय सचिव राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेने   राज्यभरातील एसटी आगार आणि विभागीय कार्यालयांसमोर निदर्शने आयोजित केली होती. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एसटी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर  कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. एसटी कर्मचाऱ्याना पगारवाढ, महागाई भत्ता, भाडेवाढी, बदल्या, आणि आर्थिक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले . 

संघटनेचे आगार अध्यक्ष अमोल राठोड यांचे नेतृत्वात शेगाव आगारातील बहुतांशी कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला .त्यानंतरही कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. बुलढाणा, शेगाव शिवाय मलकापूर, चिखली, खामगाव, जळगाव जामोद आणि मेहकर एसटी बस आगाराताही आंदोलन करण्यात आले. तेथील एसटी कर्मचारी, कामगार बहुसंख्येने आंदोलनात सहभागी झाले.

काय आहे मागण्या?

एसटी कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्ता देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी,  जाहीर केलेली पगारवाढ एप्रिल २०२० पासून लागू करण्याचे आश्वासन देऊनही ती लागू करण्यात आली नसून ती लागू करावी, खात्यांतर्गत प्रथम बदली अर्जानुसार बदल्या कराव्यात या मागण्या आहेंत. एकूण एकोणवीस मागण्यासाठी निदर्शने देण्यात आली. एक एप्रिल दोन हजार विस ते एकतीस मार्च दोन हजार चौवीस दरम्यान ची देय थकबाकी देण्यात यावी, दोन हजार अठरा पासून थकीत महागाई भत्ता देण्यात यावा, दरमहा कमी वेतन देऊ नये, पन्नास टक्के महागाई भत्ता देण्यात यावा, कोरोना काळात रजेचे अर्ज घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या रजेची रक्कम देण्यात यावी, मल्टी ट्रेड संदर्भात महा व्यवस्थापक यांच्या सोबत संघटनेची बैठक लावण्यात यावी, चालू महिन्यापासून वेतन वाढ लागू करावी  आदि एकोणवीस मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

Story img Loader