वर्धा : सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहे. दोनशे ते अडीचशे रूपये किलोप्रमाणे ही भाजी विकल्या जात आहे. त्यामुळे त्याचे व्यवहारपण रोखीनेच केल्या जात आहे. मात्र या प्रकरणात टोमॅटो विक्रीचे पैसे थकविल्याने चक्क चाकूने भोसकण्यात आले.
हिंगणघाट येथे शुभम मनोहर टामटे यांच्या भाजी विक्रीचे दुकान आहे. त्यांनी विकलेल्या चार कॅरेट टोमॅटोचे पैसे मागण्यासाठी ते याच गावातील विलास थुरटकर यांच्याकडे गेले. पैसे नंतर देतो असे उत्तर मिळाल्याने टामटे यांनी पैसे आताच पाहिजे असल्याचा आग्रह धरला. त्यामुळे चिडून आरोपी विलास याने त्याच्याजवळ असलेला भाजी कापण्याचा चाकू शुभमला भोसकला. तसेच मारण्याची धमकीही दिली.
पोलीस तक्रार झाल्यानंतर आरोपी विलास याच्यावर हिंगणघाट पोलीसांनी गुन्हा दाखल केला.