नागपूर: राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या नागपूर- मुंबई द्रुतगती समृद्धी महामार्गाचा आरंभ बिंदू महामार्गा इतकाच सुंदर, आकर्षक आणि येथून जाणा-या – येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घणारा आहे. एकूण ७०१ किलोमीटर लांबीचा आणि अवघ्या सात तासात नागपूर- मुंबई अंतर पूर्ण करणा-या या महामार्गाची सुरूवात नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील शिवमडका या गावातून होते.
सुमारे एक किलोमीटर जागेत वर्तुळाकार आकारात एखाद्या रांगोळी प्रमाणे महामार्गाचा आरंभ बिंदू तयार करण्यात आला आहे. एक मोठा वर्तुळाकार चौक असे याचे स्वरूप असून येथून चार मार्ग वेगवेगळ्या दिशेने जातात. एक मुंबईकडे, दुसरा अमरावतीकडे, तिसरा हिंगण्याकडे आणि चौथा कलकत्ताकडे जातो. सर्व मार्ग आरंभ बिंदूला मिळतात.
हेही वाचा: नागपूर: नावात ‘वायफळ’, तरीही चर्चा देशभर!; खुद्द पंतप्रधान…..
या चौकाच्या मध्ये शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या महामार्गाला यापूर्वीच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. समृद्धीच्या महामार्गाच्या उद्घघाटनाच्या निमित्ताने (११ डिसेंबर) आरंभ बिंदूची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कर्दळी, पाम आणि खजुराची झाडे लावण्यात आली आहे. राजेश गोतमारे हे या प्रारंभ बिंदूचे रचनाकार आहेत़.