बुलढाणा : सिंदखेडराजा येथे पार पडलेल्या राज्य कृषी महोत्सवात मूक प्राण्यांच्या वात्सल्याचे प्रदर्शन घडले. दहा महिन्यांपासून एका कालवडचे पालन पोषण करणाऱ्या बकरीच्या मायेने सर्वच थक्क झाले. आज जाहीर झालेल्या निकालात माय लेकीची ही जोडी प्रोत्साहनपर बक्षिसाची मानकरी ठरली.
अभिता एग्रो कंपनी व कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवात पशु-पक्षी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. त्यात सिंदखेडराजा येथील सुभाष टाकळकर यांनी एक बकरी व गाईच्या लेकीचा (कालवडचा) समावेश होता. बकरी व कालवड आई-लेकी सारखे बागडत असल्याचे दिसून आले. यासंदर्भात मालक टाकळकर यांनी सांगितलेली हकीकत ऐकूण शेतकरीच नव्हे तर आयोजकदेखील थक्क झाले.
हेही वाचा – ‘स्त्री शक्ती संवाद यात्रा’ कशासाठी? पेडणेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या…
टाकळकर यांच्या गाईने एका कालवडीला जन्म दिले. आठवडाभर गाईने पालन केले. मात्र, एक दिवस जंगली प्राणीमुळे (रोही) ती बिथरली. यापरिणामी ती आपल्या लेकीला जवळ घेईना की दूध पाजेना. मात्र, टाकळकर यांच्याकडे असलेल्या बकरीचे वात्सल्य जागृत झाले व तिने कालवडला दूध पाजणे सुरू केले. मागील १० महिन्यांपासून बकरीच तिची आई झाली आहे. आपल्या पिल्लासारखे ती तिचा सांभाळ करीत आहे. दोन्ही एकमेकांशिवाय राहत नसल्याचे टाकळकर यांनी सांगितले.
हेही वाचा – शेफ विष्णू मनोहर करणार अयोध्येत ७ हजार किलोचा ‘श्रीराम शिरा’
महाकाय रेडा प्रथम
आज जाहीर झालेल्या पशु प्रदर्शनीच्या निकालात माय लेकीची ही जोडी प्रोत्साहनपर परितोषिकाची मानकरी ठरली. पहिले पारितोषिक महाकाय ‘युवराज’ या रेड्याला देण्यात आले. राजहंस ढवळे, मोहम्मद उस्मान (मूर्रा म्हैस), शिवप्रसाद ठाकरे, अतुल खेकाळे (कुत्रा), अतुल शिंदे (रेडा) यांनाही सन्मानित करण्यात आले.