नागपूर : राज्यातील वनखात्याच्या ताफ्यात आता लवकरच नवीन व अत्याधुनिक वाहने दाखल होणार आहेत. त्याच वेळी जंगल आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी कायम तत्पर असणाऱ्या खात्यातील अधिकाऱ्यांना नवीन शस्त्रेही दिली जाणार आहेत. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी खात्याच्या अत्याधुनिकीकरणासाठी आणि अधिकाऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी हा निर्णय घेतला आहे.

आसाम आणि महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांना शस्त्र बाळगण्याची परवानगी असल्याचे निरीक्षण काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. सध्या अत्याधुनिक शस्त्रधारी शिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाळू तस्कर, अतिक्रमणाचे प्रमाणही वाढले आहे. यातून वनरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. शस्त्रांच्या अभावामुळे वनरक्षकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी वनरक्षकांच्या सुरक्षेसाठी रिव्हॉल्वर, पिस्तूल, रायफल आदी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहने बदलण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनखात्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर २०१६ मध्ये खात्यासाठी १०० नवीन अत्याधुनिक वाहने खरेदी केली होती. जुनाट जीप व तत्सम मोटारींच्या मर्यादित संख्याबळावर जंगल संरक्षणाची जबाबदारी ढकलली जात होती. त्यामुळे ११ प्रादेशिक वनविभाग आणि सहा व्याघ्रप्रकल्पांतील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना नवीन वाहने देण्यात आली. आता नाईक यांनीही वनखात्यातील वाहने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

खरेदी केलेली शस्त्रे धूळखात

६० पेक्षा अधिक देशातील वनरक्षकांची संघटना असलेल्या ‘इंटरनॅशनल रेंज फेडरेशन’च्या मते, २०१२-१७ दरम्यान भारतात १६० हून अधिक वनरक्षक कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडले. याच कारणांमुळे २०१३ मध्येही वनखात्याने वन्यजीव व जंगल संरक्षणासाठी पश्चिम बंगालमधील इसापूर शस्त्र कारखान्यातून ८८ पिस्तुलांची खरेदी केली होती. त्यानंतर ही शस्त्रे नागपुरात आणण्यात आली. मात्र, ती बराचकाळ धूळखात पडली होती.