राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवापासून सुरुवात होणार आहे. नागपूर विभागातील ४८४ केंद्रांवरून १ लाख ५५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दिशेने फार महत्त्वाचे असते. त्यामुळे मुलांसह पालकांनाही परीक्षेचे तेवढेच दडपण असते. हल्ली मुल अभ्यासाचा कंटाळा करतात किंवा थोडा वेळ अभ्यास केला की लगेल सोशल मिडीयाकडे वळण्याच्या तक्रारी नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र, मुलं अभ्यासाचा कंटाळा करत असतील तर पालकांनी काय करावे यासंदर्भात किशोरवयीन मुलांच्या समूपदेशक डॉ. मंजुषा गिरी यांनी काही उपाय सूचवले आहेत.
डॉ. गिरी सांगतात की, उदाहरणादाखल जर काही वेळात मुलगा किंवा मुलगी अभ्यासाचा कंटाळा करत असेल तर याठिकाणी आईची भूमिका फार महत्त्वाची ठरते. मुलाला आपण परीक्षा आहे अभ्यास कर, कंटाळा करू नको असे दैनंदिन सल्ले देण्याऐवजी काही प्रयोग करून पाहू शकतो. जसे आपणही घरातचे एखादे काम हातात घ्यावे. उदाहरणात भाजी तोडायला घेतली तर मुलाला हे पटवून द्या की जसे तू काम करतोस तस मीही काम करताच आहे. मग त्याच्याशी पैज लावा, माझी भाजी तोडून होईपर्यंत तू अभ्यास कर. यामुळे किमान तो तितका वेळ तरी कंटाळा करणार नाही. असे छोटे-मोठे प्रयोग केले तर मुलं आपल्यासोबत अभ्यासात रमू शकतात. याशिवाय परीक्षेच्या दिवसात मुलांना सकस आहार आणि पुरेशी झोप देणेही आवश्यक असते. परीक्षा आहे म्हणून कमी झोप घेणे हा उपाय नाही. याकडे विद्यार्थी आणि पालकांनीही लक्ष द्यावे असाही सल्ला त्यांनी दिला.