नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. अनेक भागातील रस्ते बंद होते. तर काही भागात रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्याअगोदरच अनेकांची दुहेरी परीक्षाच झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, विभागामध्ये काही तुरळक प्रकार वगळता परीक्षेचा पहिला दिवस शांततेतच पार पडला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली. नागपूर विभागातून १ लाख ५८ हजार ५३७ विद्यार्थी ५०४ केंद्रांवर परीक्षा दिली. गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल विभागाच्या मदतीने यंदा प्रत्येक परीक्षा केंद्रावर भरारी पथके होती. पहिला पेपर इंग्रजी असून सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. प्रात्यक्षिक, श्रेणी, मौखिक आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आली. लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे.यासाठी ५०४ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

सरकारी शाळांसोबतच अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागपूर विभागाच्या वतीने प्रश्नपत्रिकांसाठी ८४ परीरक्षण केंद्र (कस्टडी) तयार करण्यात आले आहेत. अमरावती मार्ग आज बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना अडचण आली. प्रशासनाकडूनही याची पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला. तसेच बजाजनगर चौकामध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळेही काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

विद्यार्थ्यांच्या हातात प्रश्नपत्रिका येताच…

घरातून परीक्षा केंद्राकडे निघताना हृदयाची स्पंदने वाढलेली होती. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर सातत्याने घसा कोरडा पडत होता, वेळेवर केलेला अभ्यास आठवेल की नाही ही भीती होती. परंतु हातात प्रश्नपत्रिका आली आणि ‘टेन्शन’ कुठल्याकुठे पळाले अन् परीक्षेची सुुरुवात ‘झक्कास’ झाली! इंग्रजीचा पहिलाच पेपर देऊन बाहेर निघालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली. एकीकडे विद्यार्थी परीक्षाकेंद्राच्या आत पेपर सोडवित असताना त्यांना सोडण्यास आलेल्या अनेक पालकांनी पूर्ण वेळ केंद्राबाहेरच उभे राहून प्रतीक्षा केली. मुलांच्या परीक्षेचा तणाव पालकांवरच जास्त जाणवून येत होता. त्यांच्या मनातील चलबिचल स्पष्टपणे दिसून येत होती. काही पालकांनी तर मुलांच्या परीक्षेसाठी कार्यालयातून रजाच घेतली आहे. पेपर सुटल्यानंतर पाल्यांची विचारपूस केल्यानंतर पालकांचा तणाव दूर झाला.