बुलढाणा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती झाली की त्या कर्मचाऱ्याला एकाच ठिकाणी कायम ‘अडकून’ पडावे लागत होते! याचे कारण या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदलीचे प्रावधानच नव्हते… मात्र आता त्यांच्या बदलीचा मार्ग सुकर झाला आहे. या संदर्भाततील शासन निर्णय १० डिसेंबर रोजी निर्गमित झाला आहे . या निर्णयाचे कर्मचाऱ्यांकाडून स्वागत करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य, आयुष्, परिवार कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे .केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नव्हत्या. या अभियानांतर्गत नोकरीला लागल्यानंतर एकाच पदावर एकाच ठिकाणी कर्मचाऱ्यांना काम करावे लागत होते.
बुलढाणा जिल्हाच नव्हे तर राज्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची ही अडचण ठरली.या विभागांतर्गत काम करत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदली संदर्भातील विनंती केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती.अधिकाऱ्यांच्या बदली विनंती संदर्भात आणि बदलीच्या मागणीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे.
हेही वाचा…लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
एक वेळ बदलीस मुभा!
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना संपूर्ण सेवा कालावधीत एक वेळ विशेष बाब म्हणून बदली करण्यास राज्य शासनाने मंजुरात दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय १० डिसेंबर २०२४ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे आता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदलीचा मार्ग सुकर झाला आहे . यामुळे समुदाय आरोग्य अधिकारी प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांचे आभार मानले आहे.