यवतमाळ : राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दोन सदस्यीय सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर चालत आहे. दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांवरही वारंवार तारखा देण्याची केविलवाणी वेळ आली आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केली. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून आल्यानंतर यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार यांनी राळेगाव, मारेगाव व वणी तालुक्यातील नुकसाग्रस्त भागांची पाहणी केली. येथील परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, कोण, कधी, कुठे दौरा करीत आहे, या बालीश चर्चा बंद करून सत्ताधाऱ्यांनी अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी त्यांच्या बांधापर्यंत पोहचण्याची संवेदनशीलता दाखवावी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयेप्रमाणे मदत द्यावी तसेच शेतमजुरांनादेखील मदतीचा हात द्यावा, असे पवार म्हणाले.
विदर्भात अतिवृष्टीसह संततधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्धा, गडचिरोली, अमरावतीपेक्षा यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतल्यानंतर अंदाजे सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले. कधी नव्हे इतकी भयंकर स्थिती शेतीची झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केवळ चर्चा करण्यात वेळ न घालविता हेक्टरी ७५ हजार रुपयांप्रमाणे तत्काळ मदत करावी. करोना काळात आम्ही ज्याप्रमाणे मदत दिली, तशीच धान्यासह इतर आवश्यक मदत मजुरांना द्यावी. शेतकऱ्यांच्या नुकसानीची स्थिती पाहता सरकारने त्वरित पावसाळी अधिवेशन बोलवावे, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. मात्र, हे सरकार ना अधिवेशन बोलावत आहे, ना मंत्रीमंडळ विस्तार करीत आहे आणि ना शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेत आहे, अशी टीकाही पवार यांनी केली. यावेळी आ. अमोल मिटकरी, आ. इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, वसंतराव घुईखेडकर, क्रांती धोटे, ख्वाजा बेग, राजू तोडसाम, आदी उपस्थित होते.