नागपूर : राज्य सरकारने दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द करून  प्रवाशांना दिलासा दिला आहे. ही प्रवाश्यांसाठी चांगली बाब आहे. परंतु यात महामंडळाचे अंदाजे १०० कोटी रुपये नुकसान होणार आहे. ही रक्कम शासनाने एसटीला दिली पाहिजे, म्हणजे त्यातून कर्मचाऱ्याना दिवाळी भेट रक्कम देता येईल. त्यामुळे सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत आणखी महत्वाची माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसटीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम देण्यासाठी निधी कमी पडत असल्याने इतर कर्मचाऱ्यां प्रमाणे त्यांना सुद्धा दिवाळी सण साजरा करता यावा, या हेतूने अनेक वर्षे बंद पडलेली दिवाळीसाठी मिळणारी रक्कम दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना सुरू करण्यात आली. दरम्यान या काळातच एसटीचा महसूल वाढवण्यासाठी हंगामी भाडेवाढ करण्याची योजना अमलात आणली गेली. त्यातून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम दरवर्षी देण्यात येत आहे. दिवाळी सण तोंडावर आल्याने महामंडळाने शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावानुसार अद्याप अर्थसाहाय्य देण्यात आलेले नाही. ही रक्कम मिळाल्यानंतरच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम देण्याचा विषय मार्गी लागणार आहे.

हे ही वाचा…ईव्हीएमवर टीका करणारे आता मतदार यादीवर बोलू लागले, बावनकुळेंची टीका

कर्मचाऱ्यांचे दिवाळी भेटकडे लक्ष

दिवाळी सण जवळ येत असल्याने महामंडळातील कर्मचाऱ्यांचे लक्ष दिवाळी भेट  रक्कमे कडे  लागून राहिले आहे. नेमकी कधी मिळणार या विषयीची उत्सुकता कर्मचाऱ्यांना असून राज्य सरकारच्या निर्देशाने रद्द करण्यात आलेल्या हंगामी भाडेवाढीची प्रतिपूर्ती रक्कम तात्काळ महामंडळाला वर्ग करावी. जेणे करून हा प्रश्न मार्गी लागेल, असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

हे ही वाचा…दलित असल्याने महायुतीकडून छळ – रश्मी बर्वे; जातप्रमाणपत्र रद्द करण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर

दिवाळी हंगामी भाडेवाढ मधून  एसटीला साधारण शंभर कोटी  रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. पण भाडेवाढ मागे घेतल्याने त्यावर पाणी पडले आहे. महामंडळाच्या बस खचाखच भरून जात असल्या, तरी प्रत्यक्ष एसटीच्या तिजोरीत अर्ध्यापेक्षाही  कमी रक्कम पडते. यातून दैनंदिन खर्च भागविला जातो. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलत मूल्याची रक्कम शासनाकडून दिली जाते, परंतु मागील काही महिन्यांपासून  सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीची पूर्ण रक्कम दिली जात नाही. त्या मुळे कर्मचाऱ्यांची देणी थकली असून फक्त पगार होईल एवढीच रक्कम महामंडळाला दरमहा शासनाकडून दिली जात आहे. दिवाळी भेटीसारखा आर्थिक खर्च करायचा असल्यास महामंडळाला शासनाकडे हात पसरविल्या शिवाय पर्याय राहत नाही. याही वर्षी असाच पेच निर्माण झाला असून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी सुमारे ५५ कोटी रुपयांच्या रक्कमेच्या मागणीचा महामंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्यावर अद्यापि निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे  हंगामी भाडेवाढ मधून मिळणारे १०० कोटी रुपये अपेक्षित उत्पन्न मिळणार नसून ही रक्कम शासनाने महामंडळाला द्यावी किंवा दिवाळी साठी खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून प्रवाशां प्रमाणे कर्मचाऱ्यांना सुद्धा आपली दिवाळी आनंदात साजरी करता येईल, असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government canceled diwali fare hike benefiting passengers but costing corporation rs 100 crores mnb 82 sud 02