यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना महागाईला सामोरे जावे लागत आहे. आधीच रासायनिक खतांची भरमसाठ दरवाढ, डिझेल महागल्याने शेतीच्या मशागतीचा वाढलेला खर्च आणि आता महाबीजचे बियाणे देखील अपेक्षेहून जास्त महाग झाल्याने शेतकऱ्यांना त्याची झळ सोसावी लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मारायचे ठरवले आहे का, असा सवाल भाजपचे नेते व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
गेल्या हंगामाच्या तुलनेत सोयाबीनच्या बियाण्यांच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली आहे. महाबीजची सोयाबीनची ३० किलोची बॅग ही साधारणपणे २२५० रुपयांपर्यंत मिळत होती, यंदा हीच बॅग २ हजार रुपयांनी महाग झाली असून या बॅगसाठी शेतकऱ्यांना आता ३९०० ते ४३५० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या हंगामात काढणीदरम्यान झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते, त्यामुळे अपेक्षित कच्चे बियाणे मिळाले नाही. बियाणे मिळविण्यासाठी उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला गेला. अतिउष्णतेमुळे या उन्हाळी हंगामातूनही अपेक्षित सोयाबीन मिळू शकले नाही. परिणामी महाबीजचा सोयाबीन बियाणे पुरवठा कमीच राहणार आहे. सोयाबीनचे वाढलेले भाव, प्रक्रिया, पॅकिंग, वाहतुकीचा खर्च असे विविध प्रकारचे वाढीव खर्च पाहता सोयाबीन बियाण्यांची दरवाढ अपरिहार्य होती, असे महाबीजच्या अधिकाऱ्यांनी सांगून दरवाढीचे समर्थन केले असले तरी यावर आक्षेप घेत डॉ. बोंडे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा