लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ : प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना – पाणलोट विकास घटक २ अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या पाणलोट रथयात्रेचा राज्यस्तरीय शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते यवतमाळ येथून झाला. गावोगावी मृद व जलसंधारणाचे महत्व ही रथयात्रा भावी पिढीसह नागरिकांना पटवून देईल, असे शुभारंभाप्रसंगी बोलताना मंत्री संजय राठोड म्हणाले.

माती व पाणी येणाऱ्या पिढींसाठी महत्वाचे आहे. यात्रेच्या माध्यमातून त्याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. राज्याला दुष्काळ व टँकरमुक्त करण्यासाठी केंद्रासह राज्याचा देखील कार्यक्रम आपण राबवतो आहे. जलयुक्त शिवार योजनेतून चांगले काम झाले. पुढे देखील हे अभियान आपण राबवित असून यात लोकसहभाग फार महत्वाचा ठरणार आहे, असे राठोड पुढे बोलताना म्हणाले. वसुंधराचे दिलीप प्रक्षाळे यांनी प्रास्ताविक केले. कमलाकर रणदिवे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

शुभारंभ झाल्यानंतर ही यात्रा दिग्रस तालुक्यातील लाख, तुपटाकळी, काटी, रामनगर गावाकडे रवाना झाली. त्यानंतर वाशिम जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. आज एकाचवेळी तीन यात्रा वेगवेळ्या ठिकाणाहून आज रवाना झाल्या. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक या योजनेच्या राज्यातील १४० प्रकल्प क्षेत्रातील ३० जिल्ह्यातील ९७ तालुके व ३६० गावातून पाणलोट रथ ५० दिवस जनजागृतीचे काम करणार आहे. शुभारंभावेळी मृद व जलसंधारणाची सामुहिक शपथ घेण्यात आली.

यात्रेदरम्यान पाणलोट अंतर्गत नवीन कामांचे भूमिपूजन, झालेल्या कामांचे जलपूजन तसेच लोकार्पण, वृक्ष लागवड, जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती, भूमी जलसंवाद, श्रमदान असे उपक्रम होणार आहेत. यात्रेत दृकश्राव्य पद्धतीचे फिरते मोटार वाहन राहणार असून गावकऱ्यांना आभासी पाणलोट सहलीचा अनुभव घेता येईल. यात्रेदरम्यान माती व पाणी परीक्षण केले जाईल. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना धरण व तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालय व प्रकल्प संचालक आत्माच्यावतीने दोन गटांना संजय राठोड यांच्याहस्ते ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक अंतर्गत हे ट्रॅक्टर श्रीराम सेंद्रीय उत्पादक गट, लाख रायाजी व रेणुका शेतकरी बचतगट, तुपटाकळी (ता.दिग्रस) अनुदानावर वितरण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, वसुंधरा पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, जलसंधारण विभाग नागपुरचे मुख्य अभियंता वसंतराव गालफाडे, वसुंधराचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप प्रक्षाळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुपेश दमाहे आदी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State level launch of panlot rath yatra to create awareness about water conservation nrp 78 mrj