नागपूर : उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्यासाठी सर्वांची एकच धावपळ उडाली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनाही मंगळवारी अर्ज भरायचा होता. प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या प्रचार ताफ्यात मोठ्या संख्येने वाहने होती. त्यापैकी पाच वाहने परस्परांवर धडकली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघात पक्षाने उमेदवारी दिली आहे. ते मंगळवारी अर्ज भरणार असल्याने सकाळपासूनच पक्षाकडून त्याची तयारी सुरू करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष अर्ज भरणार म्हणून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले. गावोगावातून कार्यकर्त्यांना बोलवण्यात आले. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज भरण्यासाठी नागपुरात आले आहे. तेथून ते कामठीला जाणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यातील चार ते पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या. सावनेर मार्गावरील अंबिका बारजवळ ही घटना घडली. त्यात भाजपचे तीन कार्यकर्ते जखमी झाले.. जखमींना सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या मदतीने जिवतोडे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा…खुशी के आंसू! उमेदवारी मिळताच आमदारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले…
u
बावनकुळे कामठी मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले आहे. २०१९ मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. मात्र त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवली जात आहे. त्यामुळे यावेळी कामठी मतदारसंघातील बावनकुळे यांची लढत अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसने सुरेश भोयर यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपसाठी हा मतदारसंघ जेवढा महत्वाचा आहे तो तेवढाच काँग्रेससाठीही आहे. त्यामुळे यावेळी हा पक्ष सर्व ताकद पणाला लावणार असल्याचे चित्र आहे. भाजपने विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना उमेदवारी नाकारून बावनकुळे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामळे सावरकर नाराज आहे. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पक्षातून सुरु आहेत. विधानसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा सावरकर यांच्याच नेतृत्वात राबवली जाणार असल्याचे यापूर्वीच बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. निवडणुकीपूर्वी काही महिने आधी बावनकुळे पुत्राचे हीट ॲण्ड रन प्रकरण चांगलेच गाजले होते. शिवसेना (ठाकरे) नेत्यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. त्याचे पडसाद राजकारणाच्या पटलावर उमटले होते.