लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : आज सायंकाळी भाजपचा जिल्हा मेळावा आटोपला. अन्य जिल्हा मेळाव्यात काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्यावर आरोपाच्या फैरी झडल्या. इथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांची व्याख्या केली व कामाचे सूत्र ठेवले.

डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार डॉ. पंकज भोयर, दादाराव केचे, माजी खासदार रामदास तडस यांची धडाकेबाज भाषणे झाली. पण बावनकुळे यांनी कार्यक्रमाचा नुरच पालटला. ते म्हणाले की भाजपाचा कार्यकर्ता निवडणुकीत जिंकतो किंवा शिकतो, तो पराजित होत नाही. भाजपा कार्यकर्त्यांनी संपर्क, संवाद, सर्मपण आणि परिश्रम केले तरच विधानसभा निवडणुकीत विजय मिळविता येईल, अशी चर्त:सूत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम भाजपा कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

आणखी वाचा-मेहकरात गर्भलिंग निदान, सोनाग्राफी केंद्राला टाळे; दोघे ताब्यात

बावनकुळे म्हणाले की, संघटना ही सत्तेपेक्षा मोठी आहे, या भावनेतून आपण कामाला सुरुवात करावी. पक्षाचे धोरण एक व्यक्त किंवा लोकप्रतिनिधी ठरवित नाही तर संघटना ठरविते. कार्यकर्त्यांमधील ‘मी’ हा भाव सोडून काम करावे. केंद्रातील मोदी व राज्यातील महायुतीचे सरकारने राबविलेल्या गरीब कल्याणाच्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी द्यावी. मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू असून प्रत्येक बुथवर किमान वीस मते वाढविण्याचा भाजपाच्या बुथ प्रमुखांनी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रात भाजपा महाविकास आघाडीतीन तीन पक्षासह खोटा नॅरेटिव्ह सोबत लढत होती. विरोधकांनी संविधान बदलणार, खटाखट पैसा देणार अशी खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली. राहुल गांधींसह महाविकास आघाडीतील सर्व नेते खोटे बोलले. विरोधकांचा खोटारडेपणा दाखविण्याचा प्रयत्न करण्यासाठी मतदारांशी थेट संपर्क व सोशल मीडियाचा वापर करावा.

आणखी वाचा- प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्याकडून शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी? धुळखात पडलेल्या दुचाकी रुग्णवाहिकेच्या…

उद्धव ठाकरे बेईमानी करून मुख्यमंत्री झाल्यावर मोदी सरकारच्या योजना थांबविण्याचे काम केले. यामुळे वर्धा जिल्ह्यातील जनतेच्या हिताच्या १५ योजना बंद झाल्या. आता कॉंग्रेसचा खासदार देखील मोदी सरकारच्या योजना बंद करण्यासाठी काम करेल. येथील विकासाचे प्रश्नच संसदेत मांडणार नाही तर मोदी सरकारचा संसदेत आणि संसदेच्या बाहेर विरोध करेल. महायुतीचे आमदार निवडून आले तर मोदी सरकार व महायुती सरकारच्या सर्व योजना पाच वर्षांसाठी लागू होतील असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. लोकसभा क्षेत्र प्रमुख सुमित वानखेडे, आमदार मदन येरावार, सुधीर दिवे, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. भोयर यांच्या कार्य पुस्तिकेचे विमोचन बावनकुळे यांनी केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State president chandrashekhar bawankule defined the bjp workers and laid down the work formula pmd 64 mrj