लोकसत्ता टीम
नागपूर: अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची गंभीर दखल राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली असून सोलापूरकर यांना नोटीस बजावली आहे.
सोलापूर. लेखक, दिग्दर्शक व कलाकार राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदांना मानणारे, ब्राम्हण होते, असे विधान केले होते. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. सोलापूरकर यांनी बाबासाहेबांच्या ब्राम्हण असण्याबाबत संदर्भ, पुरावे आयोगापुढे सादर करावे, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे, अशी नोटीस राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी बजावली आहे.
राहुल सोलापूरकर यांनी वेदांचा संदर्भ देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हण असल्याबाबत केलेल्या वक्तव्याचे वृत्त वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांवर प्रकाशित आणि प्रसारित झाले. तशा पद्धतीच्या मौखिक आणि दूरध्वनीद्वारे तक्रारी अनुसूचित जाती जमाती आयोगाला प्राप्त झाल्या. त्याबाबत सोलापूरकर यांना आयोगाने नोटीस बजावून विचारणा केलेली आहे की, त्यांनी दिलेले संदर्भ त्यांनी दिलेल्या संदर्भांच्या पुष्ठ्यर्थ काही पुरावे, लिखान असल्यास ते आयोगाच्या पुढे करावे. सोलापूरक यांनी तसे वक्तव्य करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे आणि या देशातील दलित, शोषित, वंचितांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांनी या संदर्भात तात्काळ खुलासा करावा, अशा सूचना राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केल्या आहेत.