नागपूर : राज्याच्या परिवहन खात्यातर्फे २०१९ पूर्वीच्या सगळ्याच वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. पूर्वी संबंधित केंद्रावर जाऊन ही पाटी बसवावी लागत होती. परंतु आता सोसायटी असेल किंवा कमीतकमी २५ गाड्या असतील तर त्यांच्यासाठीही ही सुविधा तेथे संबंधित केंद्रातर्फे दिली जाईल. याचबरोबर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाची अटही आता शिथिल केल्याने कोणत्याही मोबाइल क्रमांकावरून तुम्ही नवीन नंबरप्लेटसाठी नोंदणी करणे शक्य आहे.
महाराष्ट्रामध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ होती, जी आता पून्हा वाढून ३० जून २०२५ पर्यंत झाली आहे. राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांवर या नंबरप्लेट नाहीत. त्यामुळे दिलेल्या मुदतीत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, अन्यथा नियमानुसार दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन खात्याने दिला आहे. परंतु नंबरप्लेट बसविण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने त्या बसवून घेणाऱ्यांची संख्या नागपूरसह राज्यात खूपच कमी आहे.
राज्यातील इतर जिल्ह्यातील गाडीची नोंदणी करताना शहरातील केंद्रेच दिसत नसल्याच्या काही तक्रारी आहेत. गाडी शहरात चालवत असताना नागरिकांना दूरचे केंद्र निवडावे लागत आहे. घरपोच सुविधाही उपलब्ध असल्याचे नागरिकांची मोठी धावपळ होते. त्यामुळे सोसायटीच्या अध्यक्षांनी किंवा गावातील सरपंचांनी पुढाकार घेऊन २५ किंवा त्यापेक्षा अधिक वाहनचालकांना एकत्रित करावे. https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर, आरटीओ कार्यालयाचा नंबर टाकल्यानंतर खालच्या बाजूला ‘इन्क्वायरी फॉर बल्क सोसायटी फिटमेंट’ हा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन दिलेला अर्ज भरावा. त्यानंतर कंत्राटदाराकडून संपर्क साधला जाईल. पैसे भरण्यासाठी लिंक दिली जाईल. तारीख निश्चित करून त्या दिवशी कंत्राटदाराची चमू तुमच्या भागात येऊन नवीन नंबरप्लेट बसवून देईल, असे कंत्राटदार कंपन्यांचा दावा आहे.
राज्यात नंबरप्लेट बसवण्याचे काम कोणत्या कंपनीला…
महाराष्ट्रात रोस्मार्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, रियल मॅझॉन इंडिया लिमिटेड आणि एफटीए एचएसआरपी सोल्युशन प्रा. लिमिटेड या तीन कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयानुसार, या कंपन्यांनी गाड्या वाटून घेतल्या. कुणाला कुठेही नंबरप्लेट लावता यावी, यासाठी या कंपन्यांमध्ये बोलणी सुरू आहे. एफटीए आणि रिअल मॅझॉन कंपन्यांमध्ये तसा करारही झाला आहे. रोस्मार्टासोबत बोलणी सुरू आहे, असे परिवहन खात्यातील सूत्रांचा दावा आहे.