चंद्रपूर : पावसाळ्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मधील पर्यटन बंद असते. मात्र कोअर झोन मध्ये पर्यटन करायचे आहे असा आग्रह अभिनेत्री रवीना टंडन यांनी धरला होता, अशी माहिती आता समोर येत आहे. ताडोबाच्या अधिकाऱ्यांनी कोअर झोन पावसाळ्यात बंद आहे. तिथे सफारी करता येणार नाही असे स्पष्ट सांगत अभिनेत्री रवीना टंडन हिला परत पाठविले. त्यामुळे अभिनेत्री टंडन चांगलीच नाराज झाल्याची माहिती आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि महाराष्ट्राची वन्यजीव सदिच्छा दूत रविना टंडन यांना ताडोबा प्रशासनातील समन्वयाअभावी अडचणीला सामोरे जावे लागले.
हेही वाचा… भारतातील व्याघ्रप्रकल्प शिकाऱ्यांच्या रडारवर; ताडोबा, पेंचला ‘रेड अलर्ट’
या दिवसांत रवीना मुलगी राशासोबत पावसाळ्यामुळे बंद असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या खुटवंडा गेटवर पोहोचली होती. कोअर झोन बंद असल्याने त्यांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. यामुळे रवीनाला परतावे लागले. संतापलेल्या रवीनाने रिसॉर्टमध्ये नाराजी व्यक्त केली. ही घटना ४ जुलैची आहे. रवीना तिची मुलगी राशासोबत 3 जुलै रोजी वाघाला पाहण्यासाठी एका खासगी रिसॉर्टमध्ये मुक्कामी होती. ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे वनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर त्यांना भेटायला आले.
हेही वाचा… राज्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस नाही
संभाषणात डॉ.रामगावकर यांनी रवीनाला सांगितले होते की, ताडोबात बफर झोनमध्ये सफारी करावी लागेल. त्यासाठी रवीना टंडन यांना वाहनही उपलब्ध करून देण्यात आले होते, मात्र सकाळी रवीना टंडन मुलगी राशा आणि इतर तीन जणांसह खुटवंडा गेटवर पोहोचल्यावर वन कर्मचाऱ्यांनी तिला पावसाळ्यामुळे कोअर झोन बंद झाल्याची माहिती दिली. त्यामुळे खुटवंडा गेट वरून परत जावे लागले. याबद्दल रविनाने संताप व्यक्त केला अशी माहिती आहे.