नागपूर : संविधान ज्या चार मूल्यांवर आधारित आहे, ती मूल्ये समाजात रूजवली न गेल्यास नागरिकांना मानवी प्रतिष्ठेने जीवन जगता येणार नाही. तसेच आपला देश खूप काळ अखंडित राहू शकणार नाही, असे प्रतिपादन विधि विशेषज्ञ, लेखक व निवृत्त सनदी अधिकारी समान शेखर यांनी केले.
संविधान फाऊंडेशनतर्फे संविधान व्याख्यानमाला रविभवन सभागृहात गुरुवारी आयोजित करण्यात आली. समान शेखर यांनी ‘संविधानिक मूल्ये प्रत्यक्षात उतरवणे आवश्यक आहे’ या विषयावर व्याख्यानमालेचे १४ वे पुष्प गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान फाऊंडेशनचे संस्थापक ई.झेड. खोब्रागडे होते.
समान शेखर यांनी व्याख्यानच्या सुरुवातीला संविधानाच्या प्रास्ताविकेतील समानता, स्वतंत्र, न्याय, बंधूता या चार मूल्यांचा उल्लेख केला. ही मूल्ये चांगली आहेत याची जाणीव लोकांना आहे. पण, ती मूल्ये आपल्या आचार आणि विचारात आली आहेत काय, असा सवाल केला. तसेच ही मूल्ये रूजवण्याची जबाबदारी संविधानाने लोकांवर सोपवली आहे पण, लोक ही मूल्ये लागू करण्यासाठी सरकारकडे बोट दाखवत असतात, असे नमूद करीत या मूल्यांची समज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व्यापक कार्य हाती घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
खोब्रागडे म्हणाले, संविधान हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. ज्यांना मूल्यांची जाणीव आहे, त्या सर्वांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. आरक्षणाबाबत ते म्हणाले, या देशातील ८५ टक्के बहुजन समाजाला ५० टक्के आरक्षण आहे. इतर १५ टक्के समाजाला देखील ५० टक्के आरक्षण आहे. शिवाय त्यांच्यातील आर्थिक दुर्बल नागरिकांना १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. सवर्ण समाजाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ८ लाखांची उत्पन्न मर्यादा आहे आणि एससी, एसटींना लाभ घेण्यासाठी अडीच लाखाची उत्पन्न मर्यादा आहे, याकडेही खोब्रागडे यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक रेखा खोब्रागडे यांनी केले.