चंद्रपूर : आजघडीला आपण दोन गोष्टीवर खर्च करण्यास मागे पुढे पाहत नाही. ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य आहे. मात्र ,या दोन्ही गोष्टी अतिशय महाग झाल्या आहे. शिक्षण क्षेत्र व्रताचे आहे. व्रतानुसार शिक्षण संस्था चालविल्या पाहिजे. त्यासाठी नेटाने प्रयत्न झाला पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यामधून सर्वांना शिक्षण मिळणे क्रमप्राप्त आहे. शिक्षण घेऊन माणसाने माणूस होण्याचा उद्देशाने कार्यप्रवण होण्याचा प्रयत्न करावा, असा हितोपदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज बुधवारी सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या वार्षिकोत्सव समारंभात दिला.

चंद्रपूर सन्मित्र मंडळ द्वारा संचालित बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

हेही वाचा >>>निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. परमानंद अंदनकर होते. यावेळी सन्मित्र मंडळाचे सचिव ॲड.निलेश चोरे, कमांडर सुरिंदकुमार राणा, प्राचार्य अरुंधती कावडकर, डॉ. मुकुंद अंदनकर यांची उपस्थिती होती.

डॉ. मोहन भागवत  म्हणाले, मानव आणि प्राणी यांच्यातील भेद आहे. प्राण्यांना मन नाही. भूक शमविण्यासाठी तो वैरण खातो. भूक शमल्यानंतर वैरण प्राणी तसेच सोडतो. मात्र,माणसाचे तसे नाही. त्यांच्यात विचार करण्याची क्षमता आहे. तो इतरांच्या भुकेचा विचार करतो.जो स्वतःसाठी जीवन जगतो. त्याचे नाव कोणी घेत नाही.’ नर करणी करे,तो नारायण बन जाये’. स्वामी विवेकानंद सारखे जीवन जगणाऱ्यांचे जीवन सार्थक आहे. प्रभू रामचंद्राचा आदर्श समोर आहे,असेही ते म्हणाले.

डॉ. भागवत पुढे म्हणाले, माणसाची बुद्धी निट चालली, तर नराचा नारायण होतो. अन्यथा त्याच्या नशिबात नराधम होण्याची वेळ येते. संवेदनशील माणुसच विद्वतेचा उपयोग दुसऱ्यांसाठी करू शकतो. विद्येच्या बळावर सन्मित्र होतो. सन्मित्र होण्यासाठी दृढ निश्चयाने वाटचाल करावी लागते. सर्वोत्तम शिक्षणातून उकृष्टतता घडली पाहिजे. त्याच ठिकाणी परमेश्वर आहे.

आपले सैनिक संकल्पवृत्तीने मृत्यूला सामोरे जातात. देशाच्या सीमांचे संरक्षण करतात. त्यांच्यात शिस्त,संयम,दृढ निश्चय व सामुहिक प्रयत्न असतो.तोच प्रयत्न सन्मित्र सैनिकी शाळेत केला जात आहे. याचा सार्थ अभिमान आहे. प्रयत्न केला, तर वाळूच्या कणांतून तेल काढण्याची क्षमता आपल्यात असावी. माणूस तयार करणे हे शिक्षणाचे ध्येय असावे, असाही सल्ला त्यांनी दिला.

सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव समारंभात प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा सन्मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह प्रदान करून आदरसत्कार करण्यात आला. तत्पूर्वी कार्यक्रम स्थळी प्रमुख अतिथी येताच सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मानवंदना दिली. चित्तथरारक विविध प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘स्वतंत्र ते भगवती’ हे गीत सादर करून विद्यार्थ्यांनी वाहवा प्राप्त केली.

हेही वाचा >>>Devendra Fadnavis : सरकारी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

डॉ. परमानंद अंदनकर यांनी, ‘सर्वे भवन्तु सखिनः सर्वे सन्तु निरामया’ हे ब्रिद व्हावे यासाठी सन्मित्र मंडळ कार्यरत असल्याचे म्हटले. प्रास्ताविक अ‍ॅड. निलेश चोरे यांनी, तर संचालन व आभार प्रदर्शन अरुंधती कावडकर यांनी केले. डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ‘सन्मित्र बेस्ट कंपनी अवार्ड’ने नेताजी सुभाष कंपनीला पुरस्कृत करण्यात आले. तर ‘सन्मित्र बेस्ट कॅडेट’ म्हणून नायक श्रीकांत वाडणकर या विद्यार्थ्याचा सत्कार झाला. यावेळी रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक दीपकजी तामशेट्टीवार, जिल्हा संघचालक तुषार देवपुजारी, तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक अ‍ॅड. रवींद्र भागवत, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आ. किशोर जोरगेवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र बोकारे, डॉ. मुकुंद अंदनकर, डॉ. प्रवीण पंत यांच्यासह जिल्ह्यातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

बाल सैनिकांनी सादर केले युध्द कौशल्य

डॉ. मोहन भागवत यांच्यापुढे सन्मित्र सैनिकी शाळेच्या बाल सैनिकांनी युध्द कौशल्य सादर केले. व्यायाम योग, योगासन, नियुध्द, मल्लखांब आणि घोष प्रात्यक्षिकांसह चित्तथरारक मनोरेही उभारले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Statement by sarsanghchalak dr mohan bhagwat on education rsj 74 amy