नागपूर : सध्या काही झाले की मुख्यमंत्र्यांवर आरोप किंवा टीका केली जाते. हे जे काही धंदे चालले आहेत ते वैफल्यग्रस्त असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक करतात, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. एल्विशने गणपती उत्सवात आरती केल्यावरून मुख्यमंत्र्यावर आरोप केले जातात मात्र असेच जर आम्ही काढायला लागलो तर महाराष्ट्रातील अनेक नेते अडचणीत येतील, असेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस शनिवारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. गणेश उत्सवात मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात. त्यावेळेस एल्विश यादव रियालीटी शो जिंकला होता. त्यावेळी तो एक सेलिब्रिटी होता. असे अनेक सेलिब्रिटी येऊन जातात. ज्या वेळेस तो आला तेव्हा त्याच्यावर कुठला आरोप नव्हता. त्यामुळे आता त्याच्यावर आरोप आहे. मात्र असेच जर असेल तर कुठल्या नेत्यांकडे कोण कोण गेले होते ते बाहेर काढले तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची नावे समोर येतील, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी गोंदियात येणार ?
ड्रग्जच्या बाबतीत सहभागी असणाऱ्यांवर जेवढे कडक कायदे असेल तेवढे कडक कायदे त्यांच्यावर लावण्यात येतील, ड्रग्ज मुक्त महाराष्ट्रासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपण छापे टाकतोय. या विरोधातील लढाई ही राष्ट्रीय स्तरावर लढावी लागणार आहे. जे लोक ड्रग्ज तयार करत होते आणि विकत होते अशा सगळ्या लोकांवर कारवाई सुरू झाली. गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई होईल. पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यात सहभागी असतील त्यांच्यावर ३१२ प्रमाणे त्यांना निलंबित केले जाईल, असेही फडणवीस म्हणाले.
पुराव्याशिवाय केलेल्या आरोपांना अर्थ नसतो. अनेक वेळा ते आरोप घुमून फिरून आपल्यापर्यंत परत येतात. जे ललीत पाटील प्रकरणात आपण बघितले, कशाप्रकारे त्याला संरक्षण मिळाले आणि कुणी संरक्षण दिले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा बाबतीत कुणावर तथ्यहीन आरोप करू नये, असेही फडणवीस म्हणाले.