प्रशांत देशमुख
वर्धा : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज जय महाकाली शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात हजेरी लावली. संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमापूर्वी ते चर्चा करीत बसले असताना त्यांना सचिव सचिन अग्निहोत्री यांनी खादी वस्त्रात लपेटलेली भेट दिली. ती राज्यपालांनी उघडून बघताच त्यांना पाच पुस्तके दिसली. महात्माजींचे सत्याचे प्रयोग, राष्ट्रसंतांची ग्रामगीता तसेच त्यांचे इंग्रजीतील चरित्र, विनोबाजींची गीताई व लीळाचरित्र ही पुस्तके त्यात होती. ती पाहून राज्यपाल म्हणाले, हे अतिउत्तम, नक्की वाचणार. हे तर संचीतच. त्यांना माहिती दिल्यावर ते प्रभावित झाल्याचे अग्निहोत्री म्हणाले.
पुढे कार्यक्रमात भाषण करताना राज्यपाल म्हणाले की, येणारे युग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे आहे. त्या दृष्टीने अभ्यासक्रम शिकविले पाहिजे. लहान गावात शिक्षण केंद्रं सुरू करावीत. या संस्थेत आईवडिलांना जपण्याचा दिला जाणारा संस्कार सर्वात मोलाचा आहे. संस्थाध्यक्ष त्यावर भर देतात ही बाब प्रशंसनीय ठरावी. त्यांच्या हस्ते शिवशंकर या अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. विविध गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांनी सत्कार केला. संस्थाध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी आपल्या भाषणातून विविध उपक्रमांची माहिती दिली. कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे व कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. सचिन अग्निहोत्री यांनी प्रास्ताविक केले.