नागपूर : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे प्रचार संपवून परत येत असताना त्यांच्यावर चार अज्ञात आरोपींनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख थोडक्यात बचावले. मात्र, या हल्ल्यामागे अनेक तर तर्कवितर्क लावल्या जात आहेत. नागपूर ग्रामीण पोलिसांनी मात्र या घटनेला गांभीर्याने घेऊन लगेच गुन्हा दाखल केला आहे.

 अनिल देशमुख हे नरखेड गावात आयोजित प्रचार सभेला गेले होते. प्रचार सभा संपल्यानंतर आपल्या एका नातेवाईकांसह कारने काटोल कडे रवाना झाले होते. परत जात असताना बेला फाट्यानजिक अज्ञात चार युवकांनी कार वर अचानक दगडफेक केली त्यामुळे कार चालकाने कार थांबवली त्यानंतर त्या युवकांनी अनिल देशमुख यांच्या दिशेने मोठमोठे दगड फेकून हल्ला चढवला या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या कारच्या काचा फुटल्या हल्लेखोराचा एक दगड देशमुख यांच्या डोक्यावर आढळला त्यामध्ये देशमुख गंभीररित्या जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. देशमुख मात्र कारमध्येच रक्तबंबाळ अवस्थेत बसले होते. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. देशमुख यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर जखम असल्यामुळे त्यांना रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा >>>“अनिल देशमुखांनी स्वत:च स्वत:वर हल्ला करुन घेतला”; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप; म्हणाले…

नेमका कसा झाला हल्ला

प्रचाराच्या शेवटचा दिवस असल्यामुळे नरखेड येथील प्रचार सभा आटोपल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यासह अनिल देशमुख काटोल कडे निघाले होते. बेलफाट्याजवळ पोहोचल्यावर अज्ञात चार युवक रस्त्याच्या कडेला उभे दिसले. देशमुख यांची कार जवळ येताच त्यांनी अचानक कारवर दगडफेक केली. त्यामुळे कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. कार थांबताच हल्लेखोरांनी अनिल देशमुख यांच्या दिशेने दगड फेकले. अचानक हल्ला झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागला. काही वेळातच हल्लेखोर अंधारात पळून गेले.

हेही वाचा >>>अनिल देशमुखांवरील हल्ल्यामागील रहस्य… काय घडले नेमके?

काय म्हणतात पोलीस

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणात अज्ञात चार युवकांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास काटोलचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. घटनास्थळाला जिल्हाधिकारी तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सुद्धा भेट दिली आहे. आरोपीच्या शोधासाठी चार पदके तैनात केली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कुणीही बिघडण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केल्या जाईल._ हर्ष पोद्दार, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण.