लोकसत्ता टीम
नागपूर : येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात राज्यातील पहिले शासकीय संस्थेतील दंत परिवेक्षण शास्त्रचे ‘सेंटर फॉर एक्सलेंस’ कार्यान्वित करण्यात आले आहे.
येथे झिजलेल्या हिरड्यांची कृत्रिम वाढ करण्यासह संशोधनावर भर दिला जाईल. या सेंटरचे उद्घाटन शुक्रवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
आणखी वाचा-शिक्षणमंत्र्यांचे शिक्षक भरतीचे आश्वासन फोल, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा आरोप
हिरड्यांची झिज झालेले रुग्ण वाढत आहेत. या रुग्णांचा जबडा, पायातील हाड हिरड्यांमध्ये प्रत्यारोपित करून तेथे ते कृत्रिमरित्या वाढवले जाते. यासोबतच बाजारात उपलब्ध हाडांच्या भुकटीपासूनही कृत्रिमरित्या हाड बनवले जातात. या हाडांची अद्ययावत निर्मिती व संशोधन या सेंटर फॉर एक्सलेंसमध्ये होईल.
राज्यातील तिन्ही शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांत पूर्वी हा विभाग होता. परंतु नागपुरातील सेंटर फॉर एक्सलेंसमुळे आता येथे या विषयातील संशोधनालाही वाव मिळेल. याचवेळी गडकरींनी कार्बन मोनाक्साईड मॉनिटरचेही उद्घाटन केले. या मॉनिटरवर धूम्रपानाची सवय असलेल्यांबाबत यंत्र माहिती देईल. या उद्घाटन कार्यक्रमाला माजी आमदार आशीष देशमुख, दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर उपस्थित होते. संचालन डॉ. वैभव कारेमोरे यांनी केले. याप्रसंगी डॉ. विनय हजारे यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात आले.
आणखी वाचा-महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसला प्रतिसाद वाढला, डबे कमी केल्याचा सकारात्मक परिणाम
राज्यातील पहिले सीओ-२ लेझर यंत्र
राज्यातील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांतील पहिले सीओ २ लेझर यंत्र नागपुरातील दंत महाविद्यालयात उपलब्ध झाले असून शुक्रवारी या क्लिनिकचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या क्लिनिकमध्ये लेझरच्या माध्यमातून तोंड वा जिभेच्या कर्करोगाच्या रुग्णावर शस्त्रक्रियेची गरज असल्यास नेमका भागच अचूक लेझरच्या मदतीने कापला जाईल. यामुळे पेशीचे नुकसान होणार नाही. सोबतच अचूक उपचार होऊन कमीत कमी काळात रुग्णाची जखम भरेल.