अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सरकार सापत्नभावाची वागणूक देत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी १५ जुलै रोजी संपूर्ण राज्यात जिल्हास्तरावर धरणे-निदर्शने आंदोलन केले जाणार आहे.
राज्यातील इतर सरकारी, निम-सरकारी कर्मचारी व अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असणाऱ्या शासनाकडून जिल्हा परिषद व नगर पालिका, महानगर पालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांच्या बाबतीत शासन संवेदनशील नाही. शासनाकडून सातत्याने सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याची टीका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, राज्य नेते उदय शिंदे, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शासनावर केली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी मुख्यालयी निवासाची कोणतीही व्यवस्था शासनाने केलेली नसताना मुख्यालयी निवासाच्या नावाखाली घरभाडे भत्ता कपात केला जात आहे. इतर सर्व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे चार हप्ते दिले असताना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना अद्याप दुसराही हप्ता मिळालेला नाही. नगर पालिका, महानगर पालिका प्राथमिक शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाचीच थकबाकी अजूनही मिळालेली नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास मागील वर्षापासून सातत्याने विलंब होत आहे. वेतनासाठी पुरेसे अनुदान दिले जात नाही, वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि प्रवास भत्यासाठी अनुदान दिले जात नाही. सेवानिवृत्त शिक्षकांना उपदान, अंशराशीकरण, गटविमा वर्षानुवर्षे विलंबाने दिला जात आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.