लोकसत्ता टीम
नागपूर : ज्या राज्याने हे शहर वसवले, या नगरीची स्थापना केली, त्या नागपूर नगराच्या राजालाच वारंवार उपेक्षेला सामोरे जावे लागत आहे. कधी या राज्याच्या पुतळ्याचा रंग उडालेला असतो, तर कधी त्याचे सिंहासन तुटलेले असते. शहराच्या प्रशासनाला मात्र त्याची जाण नाही आणि मग त्याच्या वंशजांनी ही बाब लक्षात आणून दिली तेव्हाच प्रशासन जागे होते.
गेल्या आठवड्यात शहरात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. शहरात शेकडो वृक्षांची पडझड झाली. त्यावेळी नागरिकांची आबाळ होऊ नये म्हणून प्रशासन तत्परतेने कामाला लागले. रातोरात पडलेली झाडे उचलली आणि मार्ग मोकळा केला.
आणखी वाचा-बुलढाणा : उमेदवार घोषणेची उत्सुकता शिगेला!
याबद्दल नक्कीच प्रशासनाला धन्यवाद द्यावे लागतील, बसुन शहराचा इतिहास विसरून कसे चालेल? शहर वसवणाऱ्या राजाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? पण हे वारंवार घडत आहे. नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांचा सिव्हील लाईन नागपूर स्थित पुतळा नेहमी विविध कारणाने चर्चेत राहतो. कधी त्याचे नाव विद्रूप होते तर कधी तलवारीची मूठ गायब होते तर कधी परिसरातील अस्वच्छपणा या पुतळ्याभोवती असतो.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद द्वारा नेहमी यासाठी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा कुठे प्रशासनाला जाग येते. पुतळ्याची सातत्याने होणारी विटंबना थांबवण्यासाठी या याठिकाणी सीसीटिव्ही ची मागणी केली जाते. मात्र, याकडे नेहमी कानाडोळा केला जातो. २० मार्चला वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने म्हणा किंवा कोणी खोडसाळपणा म्हणा यामुळे पुतळ्याच्या बाजूला असलेली तोफेची दिशा बदलली. ही बाब देखील या राज्याच्या प्रजेने त्यांच्या लक्षात आणून दिली. महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या विदर्भ विभागाचे महासचिव दिनेश शेराम यांनी केली.
विशेष म्हणजे, विधान भवनाच्या परिसरातच नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बक्त बुलंद शहा यांचा पुतळा आहे.