कर्ज फेडण्यासाठी एका व्यक्तीने आपल्याच मित्राच्या घरात चोरी केली. जेवणाच्या बहाण्याने मित्राला घरी बोलावले आणि त्याच्या घरी पोहोचून दागिणे चोरी केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी गणेश रामभाऊ पौनिकर (४७) रा. सिटी प्लाझा अपार्टमेंट, आंबेडकरनगरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला होता. कैलाश प्रभाकर निमजे (३९) रा. शिवनेरी अपार्टमेंट, बिनाकी मंगळवारी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नागपूर : अनेकांच्या परिश्रमामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले – नितीन गडकरी

गणेश बीएसएनएलमध्ये काम करतात, तर कैलाश सिव्हील कामांचे कंत्राट घेतो. दोघांमध्ये जीवलग मैत्री होती आणि एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. कैलाशने फ्लॅट खरेदी करण्यासाठी बँकेतून कर्ज घेतले होते, मात्र व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने कर्जाचे हफ्ते भरणे कठिण चालले होते. शुक्रवारी कैलाशने जन्माष्टमीनिमित्त घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. गणेशही आपल्या पत्नीसह कार्यक्रमाला आला होता. कौटुंबिक संबंध असल्याने गणेशच्या पत्नीने घराची चावी सहजच कैलाशच्या फ्रिजवर ठेवली होती. कैलाशने त्यांना चावी ठेवताना पाहिले होते. त्याने ती चावी उचलली. काम असल्याचे सांगून कैलाश घरून निघाला. गणेशच्या घरी गेला आणि ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केले. परत कुलूप लावून तो घरी परतला. रात्री ११ वाजताच्या सुमारास गणेश घरी पोहोचले असता पत्नीला कपाट उघडे दिसले. बघितले असता दागिने गायब होते.

हेही वाचा – गडचिरोली : शालेय विद्यार्थ्यांच्या बसला भीषण अपघात; वाहकासह विद्यार्थी जखमी

खड्ड्यात लपविले होते दागिने
पाचपावली पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासली असता कैलाश परिसरात दिसला. ओळख पटताच पोलिसांनी त्याला अटक केली. चोरीच्या मालाबाबत विचारले असता कैलाश पोलिसांना आपल्या घराजवळील मोकळ्या भूखंडावर घेऊन गेला. तेथे खड्डा करून त्याने दागिने लपविले होते. त्यावर एक मोठा दगडही ठेवला होता. पोलिसांनी पंचासमोर दागिने जप्त केले. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात अंकुश राठोड, भटकर, गणेश ठाकरे, नितीन, आशीष आणि शहनवाज यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Steals from friend house to pay off debt amy