लोकसत्ता टीम
वर्धा: मध्य रेल्वेच्या काही प्रवासी गाड्यांमधून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती आहे. रेल्वे पोलीस दलाने काही दिवसापासून पाळत ठेवणे सुरू केले होते.काही गाड्यांची खास तपासणी सुरू झाली होती.
पोलीस निरीक्षक आर एस मीना यांची चमूला सेवाग्राम स्थानकावर एक इसम संशयास्पद स्थितीत वावरतांना आढळून आला. त्याला हटकल्यावर त्याने हातातील बॅग सोडून पळ काढला. बॅग तपासल्यावर त्यात दहा किलो गांजा सापडला. त्याची अंदाजित किंमत दहा लाख रुपयांवर सांगितल्या जात आहे. अज्ञात आरोपीविरोधात अमली पदार्थ नियमन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही अशी कारवाई झाली असल्याचे रेल्वे पोलीसांनी नमूद करीत रेल गाड्यांमधून अंमली पदार्थ वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धरपकड मोहीम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.
वर्धा ते नागपूर तसेच बल्लारशा ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या गाड्यांवर प्रामुख्याने नजर ठेवली जात आहे.