लोकसत्ता टीम
चंद्रपूर : शहरात श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात या श्वानांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे. मनुष्य व प्राणी संघर्ष टाळण्यासाठी शहरातील १८०० श्वानांचे निर्बीजीकरण केले आहे. तसेच लसीकरणाचे कामही सुरू आहे.
शहरातील मोकाट,बेवारस,भटके श्वान यांची संख्या नियंत्रित ठेवणे, रेबीज निर्मुलन व मनुष्य – प्राणी संघर्ष टाळणे या दृष्टीने चंद्रपूर महापालिका व प्यार फाऊंडेशन द्वारे श्वान लसीकरण व निर्बीजीकरणाची मोहीम सुरु केली आहे. आपल्या परिसरातील मोकाट श्वानांचे लसीकरण व निर्बीजीकरण करावयाचे असल्यास मनपाद्वारे दिल्या गेलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मोकाट, भटके श्वान ही अनेक ठिकाणची गंभीर समस्या आहे. गाडीच्या मागे धावणे,चावा घेणे,रात्रीच्या वेळेस अंगावर धाऊन जाणे त्यामुळे अपघात होणे इत्यादी प्रकारचे त्रास या बेवारस कुत्र्यांमुळे होतात. पिसाळलेल्या श्वानांच्या चाव्यामुळं, अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात.
आणखी वाचा-चंद्रपूर: मोकाट जनावरे रस्त्यावर, जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल
प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० व ॲनिमल बर्थ कंट्रोल २००१ नुसार श्वानांना मारण्यास बंदी आहे. मात्र मोकाट, भटके श्वान यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी चंद्रपूर मनपाद्वारे सदर मोहीम राबविली जात आहे. शहरातील मोकाट श्वानांची नसबंदी करण्याची जबाबदारी पेटानिटी अँड ॲनिमल रिहॅबिलिटेटर्स (प्यार ) फाऊंडेशनकडे सोपविण्यात आली आहे. शहरात अंदाजे ८ ते ९ हजार बेवारस श्वान असुन त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने निर्बीजीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मनपातर्फे आतापर्यंत १८०० श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. परीसरातील मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण तसेच लसीकरण करावयाचे असल्यास सदर माहीती ७०२८८८२८८९ या मोबाईल क्रमांकावर देण्याचे आवाहन चंद्रपूर महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.