नागपूर: साहेब.. वन्यप्राणी जास्त झालेत. आम्हाला त्रास होतोय. तुम्ही त्यांच्या नसबंदीचा आदेशच काढा. कुणीतरी राजकारणी जनतेची कैफियत घेऊन येतो आणि त्यांच्यासमोर मोठे होण्यासाठी थेट त्या प्राण्यांच्या नसबंदीचीच मागणी करतो. मग वनखात्याचे मंत्री देखील त्या प्रस्तावाच्या तयारीला लागतात. हिवाळी अधिवेशनात बिबट्याच्या नसबंदीची मागणी झाली आणि साहेब प्रस्तावाच्या तयारीला लागलेत.
आता कुणीतरी माकडांच्या त्रासाची तक्रार घेऊन आलेत आणि साहेबांनी माकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. मग देशाची लोकसंख्या वाढते आहे तर इथेही हाच पर्याय अवलंबणार का, असा प्रश्न वन्यजीव प्रेमींनी उपस्थित केला आहे. माणसांची संख्या वाढल्यामुळे त्या वन्यप्राण्यांच्या अधिवासावर कुऱ्हाड चालवली जात आहे. मग त्या बिचाऱ्या वन्यप्राण्यांनी कुणाकडे दाद मागायची, असाही प्रश्न या वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
देशात जेव्हापासून अंबानीच्या वनताराचा जन्म झाला, तेव्हापासून राज्याचे वनखाते आपली जबाबदारीच झटकण्याच्या मागे लागले आहे. वाघ पकडण्याची मोहीम तेव्हापासूनच वेगवान झाली आहे. आधी जबरीने हत्ती पाठवलेत आणि आता वाघही पाठवले. हळूहळू जंगलातील सारेच वन्यप्राणी अंबानीच्या वनतारात पाठवायचे म्हणजे आपण हात झटकून मोकळे.
अलीकडेच नागपूर भेटीत वनमंत्र्यांनी तसाच संकेत देणारे वक्तव्य केले होते. आता म्हणे माकडांच्या नसबंदीचा प्रस्ताव तयार करणार. कोकणातील फळबागा आणि शेतीपिकांना होणारा माकडांचा मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी माकडांचे निर्बीजीकरण करण्यासाठी केंद्र उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे राज्याचे वन मंत्री नामदार गणेश नाईक यांनी सांगितले. हेदेखील एका उद्योगपतीच्या म्हणण्यावरूनच होत आहे. कोकणात माकडे व वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान झाल्यानंतर भरपाई देणे हा कायमस्वरुपी उपाय होऊ शकत नाही. हे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी माकडे, वानरे यांचे निर्बीजीकरण करण्यासंदर्भात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्बीजीकरण केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे. वन्यप्राण्यांपासून फळबाग व शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नसल्याचे वनमंत्री श्री. नाईक यांनी यावेळी सांगितले.