यवतमाळ : केळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणी येथे नागरिकांकडून विविध प्रमाणपत्रांसाठी अधिक पैसे आकारणाऱ्या सेतू केंद्रांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यात आले. या केंद्राविरुद्ध कारवाई सुरू केली.तहसिल कार्यालय झरीजामणी येथे केळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाने भेट दिली. त्यावेळी सेतू सुविधा केंद्र चालकाकडून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलिअर, उत्पन्नाचा दाखला, ऐपत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे घेत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
या तक्रारीवरून उपविभागीय अधिकारी कार्यालय केळापूर येथील पथकाने सेतू केंद्रांची गुप्तपणे पाहणी केली. तसेच व्हीडीओ काढले. त्यामध्ये भोयर सेतू सेवा केंद्र, तहसिल कार्यालय चौक, झरीजामणी व ओम साई सेतू सेवा केंद्र, बिरसा मुंडा चौक, झरीजामणी हे शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दोन्ही सेतू केंद्रावर कठोर कारवाई करून परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे. नागरिकांनी या सेतू केंद्रात कोणत्याही दाखल्यासाठी अर्ज करू नये, तसेच इतर कोणतेही सेतू केंद्रचालक शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक पैसे घेत असल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयात पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात यावी, असे केळापूरच्या उपविभागीय अधिकारी याशनी नागराजन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा >>>बाबा मला माफ करा! वडिलांना चिठ्ठी लिहून तरुणाने केली आत्महत्या
जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक सेतू केंद्रचालक नागरिकांकडून सर्रासपणे अधिक पैसे घेतात. नागरिकांनी विचारणा केल्यास पैसे दिल्याशिवाय कुठेही प्रमाणपत्र मिळणार नसल्याची धमकी देतात. त्यामुळे केळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांप्रमाणे इतर उपविभागीय अधिकाऱ्यांनीही सेतू केंद्रांची पडताळणी करून नागरिकांची लूट थांबविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.